पुणे -सय्यदनगर भागात रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, आठ काडतुसे जप्त करण्यात आली. 29 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. अखेर दीड महिन्यांनी आरोपींना अटक करण्यात यश आले.
अतिक इक्बाल शेख (37, रा. सय्यदनगर), सादीक शेख (25) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. यातील फिर्यादी यांच्या भावाचे आरोपी सादिक यांच्या भावाशी वाद झाले होते. यातूनच आरोपी अतिक, सादिक आणि त्यांचा साथीदार हुसेन अशी तिघेजण फिर्यादीच्या कार्यालयाबाहेर गेले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर रस्त्यावर येऊन पुन्हा एकदा हवेत फायर करून दहशत निर्माण केली. यानंतर आरोपी पसार झाले.
या प्रकरणी दाखल गुन्ह्यात वानवडी पोलिस आरोपीचा शोध घेत होते. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून आरोपी हे पोलिसांना चकवा देत होते. या दरम्यान आरोपी अतीक आणि सादिक हे देहुरोड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, अंमलदार अजय केसरकर, अतुल गायकवाड, संतोष काळे, राहुल गोसावी, अमोल गायकवाड यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.