वाघोली – गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या परप्रांतीयासह दोघांना गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाघोली येथून अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन मोबाईल असा 85 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे-नगर महामार्गावर सातव हायस्कूल बसस्टॉप समोर करण्यात आली आहे.
शुभम शांताराम शिसवाल (वय, 19, रा. गांधीनगर मुगार रोड, खंडवा, मध्य प्रदेश) आणि सनी संजय जेधे (वय 24, रा. लोणावळा) असे गावठी कट्टा विक्रीप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथक एकला वाघोली बसस्टॉप येथे दोघेजण गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
पथकाने सापळा वाचून शुभम आणि सनीला ताब्यात घेतले. दोघांनाही अटक करून लोणीकंद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून त्यांनी हे शस्त्र कोणाला विकण्यासाठी आणले होते याचाही शोध घेतला जात आहे.