पुणे -लेनची संख्या वाढवली. पर्यायी मार्ग हळूहळू सुरू होत आहेत. मात्र, मुख्य महामार्गावर रस्त्याची रुदी कमी आणि त्यात एखादे वाहन बंद पडल्यावर कोंडी ठरलेलीच. शुक्रवारी (दि. 17) शाळा आणि ऑफिसला जाणाऱ्यांची गडबड, त्यात महमार्गावर बंद पडलेल्या ट्रकमुळे एनडीए चौक (चांदणी चौक) पुन्हा कोंडीत अडकला. त्यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा गेल्या होत्या.
एनडीए चौकातील उड्डाणपुल आणि रस्ता रुंदीकरण सुरू आहे. त्यामध्ये टप्प्याटप्याने काम पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येत आहेत. मुळशीकडून बावधन, कोथरूडला जाणारा उड्डाणपूल आणि महामार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या लेन वाढविल्यामुळे दररोजच्या कोंडीतून वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला.
मात्र, मुळशी, बावधन आणि मुंबई जवळपास 7 ते 8 लेनमधून येणारी वाहतूक चांदणी चौकातून पुढे आल्यावर रस्ता अरुंद असल्यामुळे केवळ तीन लेनमध्ये येते. त्यातच पर्यायी मार्ग अजून सुरू न झाल्यामुळे कोथरूड, वारजे, साताराकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी होते.
शुक्रवारी सकाळी या मार्गावर ट्रक बंद पडल्यामुळे चांदणी चौकातील चारही बाजूंच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला काढण्याचा प्रयत्न केला.