पुणे -महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅंक्सच्या धर्तीवरच आता जमिन विषयक महसूल कर अर्थात शेतसारा सुद्ध ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी भूमि अभिलेख विभागाने सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यातील सुमारे 314 गावांची निवड करण्यात आली असून गाव नमुन्याची डेटा एन्ट्री करण्याची काम सुरु आहे. शेतसारा भरण्याची ऑनलाइन नोटीस बजावली जाणार असून ऑनलाइन कर भरता येणार आहे.
यासाठी आता भूमि अभिलेख विभागाने ई चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरु केले आहे. त्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किंवा महसूल विभागात रजिस्टर नमुना लिहण्याची पद्धत वेगळी आहे.
या ठिकाणी आलेल्या अडचणी सोडवून संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहे. या गावांमध्ये प्रामुख्याने शेतीचा कर आकारण्यात आला. या लहान गावांमध्ये एनए जमिनी नसल्याने आता शहरालगतची गावे निवडून एनए कर सुध्दा आकारण्याच्या पर्यायाची चाचणी केली जात आहे. यासाठी तलाठ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
इंग्रज काळात शेतसाऱ्याला सुरुवात
शेतसारा हा पारंपारिक कर आहे. इंग्रजांच्या काळापासून जमिनींवर कर लावण्यास सुरुवात झाली. पूर्वी शेतसारा हा सरकारसाठी महसूल देणारा महत्त्वाचा घटक होता. कालांतराने जशी प्रगती होत गेली. तसे नव-नव्या करांची आकारणी सुरु झाली. मात्र जमिनींवर आकारला जाणारा या कराची वसुली आजही सुरु आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी होते.
शेतीचा कर हा अल्प असल्याने या कराची वसुली अपेक्षित प्रमाणात होत नाही. थकबाकीची रक्कम मोठी झाल्यावर हा कर मोठा वाढतो. थकबाकीची रक्कम ही तलाठी कार्यालयात गेल्यावरच कळते. तसेच आता घरबसल्या ऑनलाईन सातबारा उतारा असल्याने तलाठी कार्यालयात सुध्दा नागरिकांना जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसूल होत नाही.