पिरंगुट – मुळशी पॅटर्न हा गुन्हेगारीतून न दाखवता तो अभ्यासातून दाखवावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे स्पर्धा परीक्षा देण्याची क्षमता असते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे. यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्वास बाळगावा, असे प्रतिपादन पौडचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी केले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यालयातील सुमारे 450 विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंभार, पोलीस हवालदार सादिक इनामदार, विद्यालयाचे उपप्राचार्य रामदास कुसाळकर, प्रा. सोमनाथ कळमकर, प्रा. किरणकुमार घाटगे, अध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
यानिमित्त विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करून लहान मुलांमधील वाढते गुन्हेगारी इंटरनेटच्या चुकीचा वापर. शाळेमध्ये दुचाकीचा वापर, मुलींची छेडछाड, लैंगिक अत्याचार इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालय परिसरामध्ये मुले मोठ्या प्रमाणावर ट्रिपल सीट फिरणे, कट मारणे, मोबाईल फोनवर बोलत गाडी चालवणे, लायसन जवळ न बाळगणे, लायसन नसणे अशा प्रकारे बेशिस्त पणे गाड्या चालवत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहायक उपनिरीक्षक संतोष कुंभार यांनी केले.