पिंपरी -औद्योगिकनगरी, कामगारनगरी, स्मार्ट सिटीकडून मेट्रो सिटीकडे पिंपरी-चिंचवड शहराची मोठ्या झपाट्याने वाटचाल होत आहे. शहराची सध्या सुमारे 27 लाख लोकसंख्या असून शहर दिवसेंदिवस वाढत आहे. शहराच्या चारही बाजूला टोलेजंग बांधकाम प्रकल्प उभारले जात आहेत. शहरात सध्या 5 लाख 82 हजार मिळकती आहेत. त्यातुलनेत शहरात फक्त 1 लाख 70 हजार अधिकृत नळ कनेक्शनची नोंद आहे. विशेष म्हणजे शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन किती आहेत याची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात दर्जेदार मुलभूत सुविधा, प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, सुसज्ज उद्याने यासह अनेक चांगल्या सुविधा शहरात उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्यासह परराज्यातील नागरिकांची शहरात वास्तव्यासाठी पसंती मिळत आहे. शहरात पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरविले जात असून, शहराला गेल्या तीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असला तरी नागरिकांच्या पाण्याविषयी अत्यंत कमी तक्रारी असल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.
महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे 5 लाख 82 हजार मिळकतींची नोंद आहे. मात्र, शहरात आठही प्रभागात मिळून 1 लाख 69 हजार 464 नळ कनेक्शनची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरात अनधिकृत नळ कनेक्शनची आकडेवारी मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालिकेच्या ब प्रभागात 30 हजार 584 सर्वाधिक नळ कनेक्शनची नोंद असून त्यानंतर फ प्रभागात 23 हजार 616, ई प्रभागामध्ये 22 हजार 951, क प्रभागामध्ये 21 हजार 862, ग प्रभागात 20 हजार 703, ड प्रभागात 19 हजार 24, अ प्रभागात 15 हजार 671 तर ह प्रभागात सर्वात कमी म्हणजे 15 हजार 53 अधिकृत नळ कनेक्शन आहेत.
शहराच्या सीमाभागात अनधिकृत नळ कनेक्शन?
पिंपरी-चिंचवड शहरालगत आळंदी नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचा परिसर येतो. या भागातही गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने विकास होत आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहे. पालिकेच्या तुलनेत या भागात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. हा सिमा भाग असल्यामुळे या भागातील काही जणांनी पालिकेच्या पाईपलाईनमधून अनधिकृत नळ कनेक्शन घेतल्याची चर्चा आहे.
शहरात मिळकतींची संख्या जरी जास्त दिसत असली तरी एका सोसायटीमध्ये 100, 500 आणि 1000 हजार फ्लॅट आहेत. मोठ्या सोसायट्यांना 4 किंवा 6 इंची एकच नळ कनेक्शन देण्यात येते. प्रत्येक मिळकतीला एक स्वतंत्र नळ कनेक्शन नसते. त्यामुळेच मिळकती आणि नळ कनेक्शनच्या आकडेवारीत मोठी तफावत दिसून येत आहे.
-अजय सूर्यवंशी कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग