सविंदणे -पिंपरखेड (ता. शिरूर) येथील हॉटेलमध्ये घुसून वेटरला मारहाण करून गल्ल्यातील रोकड लंपास केलेल्या जबरी चोरीतील दोन आरोपींना टाकळी हाजी औट पोस्टचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, उपनिरीक्षक सुनील उगले, पोलीस नाईक धनंजय थेऊरकर, शिपाई विशाल पालवे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने हालचाल करुन आरोपींना दोन तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की. दि. 15 मार्च रोजी रात्री 1 वाजता हॉटेल बंद झाल्यानंतर विसावा हॉटेल पंचतळे येथे हॉटेलचे मुख्य गेट बंद करून वेटर संदिप भोईर हे वस्ताद आनंद सिंह व बंटी सिंग यांच्यासोबत झोपले. यावेळी कृष्णा गुंजाळ व प्रशांत शिरसाठ हे कंपाउंडवरून उडी मारून हॉटेलमध्ये शिरले. गेट वाजवले तरी का उघडले नाही, अशी विचारणा करून शिवीगाळ करू लागले. यावेळी त्यातील एकाने खाली पडलेल्या मोठ्या लोखंडी उलथण्याने संदिप भोईर याला मारायला सुरवात केली. दरम्यानच त्यातील एकाने त्याला खाली पडून धरले.
दुसऱ्याने त्याच्या खिशातील 7,300 रुपये बळजबरीने काढून घेतले. ही मारामारी सोडवणाऱ्या वस्ताद आनंद सिंह व बंटी सिंग यांनाही त्या दोघांनी मारहाण केली. तसेच हॉटेल मालक निलेश पळसकर व मॅनेजर हरिष चोरे यांना “तुम्हाला आमचे काय वाकडे करायचे ते करा आम्ही कोणालाही घाबरत नाही’ अशी शिवीगाळ करून निघून गेले.
पंचतळे परीसरातील जांबुत, पिंपरखेड, चांडोह या भागात कोणी इसम कोणत्याही व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळून खंडणी मागत असेल अगर त्रास देत असेल तर ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा. तात्काळ दखल घेऊन कठोरात कठोर कारवाई केली जाईल. माहीती देणाऱ्याचे नाव गुपीत ठेवली जाईल.
-अमोल पन्हाळकर, सहायक पोलीस निरीक्षक