– नीलकंठ मोहिते
इंदापूर -पुरणपोळी आणि होळी यांचे अतूट नाते इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातच मानले जाते. त्यामुळेच हा सण साजरा करण्यासाठी महत्त्वाचा समजला जाणारा हरभरा यांपासून बनवलेली डाळ अत्यंत महत्त्वाची असते. एकीकडे शेतकरी बळीराजा आर्थिक संकटात असल्याने, पूर्णपणे आर्थिक कणा शेतकऱ्याचा मोडलेला आहे. त्यातच महागाईने जनता हैराण झाली आहे.
डाळी, गॅस, गूळ, महागला असल्यामुळे, घरोघरी साजऱ्या होणाऱ्या होळीला पुरणपोळीच्या नैवेद्यांनी सजवण्याची परंपरा असली तरीदेखील यंदा पुरणपोळी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिन्नसांच्या किमतींमध्ये दुप्पट वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदाच्या होळीला महागाईचा रंग चढला आहे.
होळी सणाला इंदापूर तालुक्यात अधिकचे महत्त्व असून, प्रत्येक घरात प्रत्येक गावात ही होळी प्रथेप्रमाणे साजरी केली जाते. एवढेच नव्हे; तर गावच्या मारुती मंदिराच्या पाराजवळ गावची सामुदायिक होळी पुरणपोळीचा गावचा नैवेद्य दाखवत, आनंदात पेटवली जाते. केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकरी बांधवांसाठी भरीव आधार देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
मागील काही वर्षांत करोनाच्या सावटाखाली शेतकरी व गावातील नागरिक आर्थिक परिस्थितीमध्ये पिचलेला आहे. घरामधील करोना पेशंट व्यवस्थित करण्यासाठी उसनवारी केलेले पैसे, फेडण्यांमध्ये गावागावातील छोटी व्यवसायिक, शेतमजूर आजही व्यस्त आहेत. शेतीत पिकलेल्या मालाला हमीभाव नसल्यामुळे मातीमोल मालाची किंमत होत असून शेतीतील उत्पन्न अनेकांचे ठप्प झाले आहे.
यंदा उन्हाळ्याची चाहूल होळीपूर्वीच लागली असून, शेतीला व नागरिकांना पिण्याला पाणी कमी पडू लागले आहे. त्यातच वीज वितरण कंपनीच्या गोंधळामुळे कधी वीज तर कधी बत्ती गुल, असे प्रकार सर्रास ठिकाणी पाहण्यास मिळतात. आर्थिक झळा तालुक्यातील नागरिकांना प्रचंड भोगाव्या लागत असून,
यामध्ये गोरगरीब कुटुंबांना सण साजरे करणे, प्रपंच चालवणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरी करत असणाऱ्या कुटुंबांची अत्यंत हलाखीची परिस्थिती, पगार रखडल्याने व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीची ऊसबिले न मिळाल्याने, होळीच्या सणा अगोदरच गावोगावी शिमगा सुरू आहे.
घरोघरी शेतकरी महिला पुरणपोळी तयार करीत असल्या तरी, घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या पुरणपोळी बनवण्यासाठी चाकरमान्या महिला रेडिमेड पुरणपोळीला पसंती देतात. पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारी डाळ, साखर, घरगुती गॅस आदींच्या किमती वाढल्याने रेडिमेड पुराणपोळ्याही यंदा चांगल्याच महागल्या शहरात लहान पुरणपोळ्या प्रतिनग 30 ते 25 रूपये, तर मोठ्या पुरणपोळ्या 60 ते 70 रुपयांपर्यंत विक्री केल्या जात आहेत.
दरम्यान, तोंडावर मागणी वाढल्याने हरभरा डाळींच्या दरात वाढ झाली आहे. महिन्याचा सुरवातीला होळी आहे. त्यामुळे आता बाजारात वर्दळ वाढू लागली आहे. होळी आणि पुरण पोळी हे समीकरण घट्ट आहे. परंतु हरभरा डाळीचे भाव प्रति किलोला दहा ते पंधरा रुपये वाढले असल्याने, पुरणपोळी खवय्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे.
नवीन हरभऱ्याची आवक होण्यास वेळ
नवीन हरभऱ्याची आवक होण्यासाठी अजून वेळ आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवा हरभरा अद्यापी येत नाही. होळीच्या निमित्ताने हरभरा डाळीची मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत. घाऊक बाजारात हरभरा आवाक्याबाहेर दिसत आहे. डाळीच्या दरात क्विंटलमागे 300 ते 500 रुपयांनी वाढ आहे, तर किरकोळ बाजारातही प्रतिकिलोमागे अधिकची रक्कम मोजावी लागते; परंतु ही दरवाढ काही कालावधीसाठीच आहे. नवीन हरभरा बाजारात आल्यानंतर दर कमी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकरी व सामान्य जनतेसाठी चांगल्या उपायोजना करण्यासाठी प्रचंड कमी पडत असून, ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्य सरकारकडे वेळ नाही. महागाईचा आगडोंब वाढलेला असून, त्यामुळेच जनता हैराण झालेली आहे. महागाई वाढली आहे.
-अतुल झगडे, तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस