बेलसर – पुरंदर तालुक्यामध्ये शुक्रवार (दि.3) ते रविवार दि.5 दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु सोमवार (दि.6) व मंगळवार (दि.7) पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने वर्तवले आहे. सद्यःस्थितीला पुरंदर तालुक्यामध्ये गहू काढणीस, हरभरा काढणी सुरू असल्याने जर या काळात पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवसांत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 37% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 15 टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 9 ते 14 किमी दरम्यान राहील. आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे
बागायती पिकांना फटका?
पुरंदर तालुक्यामध्ये सद्यस्थितीला अनेक पिके काढण्यासाठी आहेत. त्यामध्ये गहू, हरभरा, कांदा आणि इतर भाजीपाला पिकांचाही समावेश आहे. सद्यस्थितीला जर पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते तर शेतामध्ये असलेले कांदा, डाळिंब किंवा सीताफळ यांच्यावर पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.