देगावकरांच्या विश्वासाला पात्र राहिलो : आ. महेश शिंदे
कोरेगाव -सातारा शहरालगत असलेल्या देगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर अनेक वर्षे असलेले “एमआयडीसी’चे शिक्के आता पूर्णपणे उठले आहेत. आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या विशेष पुढाकारामुळेच महायुती सरकारने हा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आमदार महेश शिंदे यांनी दिलेला शब्द खरा करुन दाखविल्याबद्दल ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख गाव असलेल्या देगावमधील शेतकरी अनेक वर्षे सातबारा उताऱ्यावर “एमआयडीसी’चे शिक्के घेऊन जीवन जगत होते.
2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आणि ग्रामपंचायत निवडणुकीवेळी आ. महेश शिंदे यांच्यासमोर हा विषय आल्यानंतर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत शिक्के उठविण्याचा शब्द दिला होता. दोन वर्षे करोना कालखंडात गेल्याने हा विषयावर निर्णय झालेला नव्हता. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष सहकार्यातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर मुंबईच्या सह्याद्रि अतिथीगृहावर आ. महेश शिंदे यांची दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी विशेष बैठक झाली. देगाव परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असून शेतकऱ्यांचा एमआयडीसीला तीव्र विरोध असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता शिंदे, देगावमधील प्रमुख पदाधिकारी सचिन आप्पा साळुंखे, लोकनियुक्त सरपंच वैशाली शिंदे, विजय घाडगे, नितीनबापू साळुंखे, श्रीकांत साळुंखे, नितीन माने, विकास पवार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत देगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर अनेक वर्षे असलेले एमआयडीसीच्या शिक्क्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पाचारण करुन माहिती घेण्यात आली. त्यानंतर आज याबाबतचा निर्णय झाला. शेतकरीहित लक्षात घेऊन तातडीने शिक्के उठविण्यास उद्योगमंत्र्यांनी मान्यता दिली. राज्य सरकारच्या राजपत्रात याबाबतची अधिसूचनाही प्रसिध्द करण्यात आली आहे.
देगाववासियांनी माझ्यावर प्रचंड विश्वास टाकला. विधानसभा निवडणुकीत चांगले मताधिक्य दिले आणि नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता देत लोकनियुक्त सरपंचदेखील मोठ्या मताधिक्याने विजयी केला. ग्रामस्थ व शेतकऱ्यांची “एमआयडीसी’चे शिक्के उठविण्याची मागणी आता पूर्ण झाल्याने मनस्वी आनंद झाला असून देगावकरांच्या विश्वासाला पात्र राहिलो, याचे समाधान असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले.
देगाव परिसरात आता होणार विकासकामे
कोरेगाव मतदारसंघातील प्रमुख उपनगर असलेल्या देगाव परिसरातील विकासकामांसाठी विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या परिरातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यात आला असून नागरी परिसरात ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरणयुक्त रस्ते, बंदिस्त गटारे केली जाणार आहेत. सातारा शहराचे प्रतिरुप म्हणून या परिसराचा सर्वांगिण विकास साधला जाणार असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.