कराड – पुणे- बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरणाचे कामासाठी येथील कोल्हापूर नाका व मलकापूरचा उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरु असल्याने महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. शुक्रवारी मलकापूर येथील भरावाचा पूल पाडण्याच्या दृष्टीने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली. त्यामुळे महामार्गावर नांदलापूर ते खोडशी दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मेगाब्लॉक झाला. यामध्ये प्रामुख्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींचे मोठे हाल झाले.
महामार्गावरील वाहतूक शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून सेवा रस्त्यांवरून वळवण्यात आली. तेव्हापासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुरु झाली. ही कोंडी पावणेबारापर्यंत कायम होती. सध्या दहावी व बारावीच्या परींक्षा सुरू असून परीक्षेच्या वेळेतच वाहतूक कोंडी झाल्याने विद्यार्थी व पालकांची चांगलीच चिडचिड झाली. काही विद्यार्थ्यांना तर एसटी व वडापमधून खाली उतरून चालत परीक्षा केंद्र गाठावे लागले.
चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावर मलकापूर ते खोडशीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून कोंडी झाल्याचे निदर्शनास येताच कराड वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व संबंधित महामार्ग रुंदीकरण कामाच्या ठेकेदारांनी तासवडे टोलनाका येथे अवजड वाहतूक बंद केली. तसेच मलकापूर येथील उड्डाणपुलावरील बंद केलेली वाहतूक खुली करण्यात आली.