इंदापूर – इंदापूर तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, इंदापूर नगरपालिका तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका रखडलेल्या आहेत. मागील सहा महिन्यांपासून या निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने फिल्डिंग, जनहिताची कामे करत, आपला करिष्मा निर्माण केला आहे. मात्र, राज्यातील निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबलेल्या असल्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यातील तेल लावलेले पैलवान कधीही निवडणुका जाहीर होऊ द्या, आम्ही सज्ज आहोत, असे सांगत मतांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत.
इंदापूर तालुक्यात तसे पाहिले तर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे दोनच पक्ष एकामेकांविरोधात, लढत असतात. त्याचप्रमाणे निवडणुका लागताच आमदार दत्तात्रय भरणे, तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराचे तगडे पॅनल करण्यावर भर देत आहेत. तर राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्तेत असल्यामुळे, माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील जुन्या नव्या सवंगड्यांना एकत्र करत निवडणुकीची तयारी परिपूर्ण करत आहेत.
शिवसेना, आरपीआय, रासप तसेच इतर राजकीय पक्ष सामाजिक संघटना मोठ्या ताकतीने या आगामी निवडणुकीत आपले उमेदवार देऊन आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत. भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आजपर्यंत इंदापूर पंचायत समितीवर आपली सत्ता पूर्ण क्षमतेने ठेवलेले आहे;
मात्र काही कालावधीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने फोडा फोडी करत याच पंचायत समितीवर अल्पकाळासाठी सत्ता मिळवली होती; दरम्यान यंदा पंचायत समिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराची करायची हा चंग कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे. तर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपल्या विचाराची सत्ता आबाधित राखण्यासाठी माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांचे नियोजन आहे.
संबंध पुन्हा बिनसले?
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे व शहा परिवाराचे राजकीय संबंध बिनसल्याची चर्चा आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा तसेच नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांची राजकीय ताकद हर्षवर्धन पाटील यांच्या विचारापासून वेगळी होत आहे, त्यामुळे शहा परिवाराकडून काही दिवसांतच वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर शहा परिवाराने वेगळा निर्णय घेतल्यास शहराला कलाटणी देणारा ठरणार आहे.
जुने का नवे गट?
इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट जुने अस्तित्वात आहेत. मात्र, नव्याने नऊ गट झाल्याचे प्रगटीकरण देखील, मागील कालावधीत प्रसिद्ध झाले.मात्र राज्य पातळीवर जिल्हा परिषदांसाठी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या गटांचा विषय गेलेला आहे.त्यामुळे जुने का नवे गट, जिल्हा परिषदेचा कारभारी नवा की जुना मात्र न्यायालयीन प्रक्रियेचा निकाल झाल्यानंतरच जनतेच्या समोर येणार आहे; मात्र “हम हैं ना, असे म्हणत जुने जिल्हा परिषद सदस्य तयारी करू लागले आहेत.