पुणे – विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला. पदवीधर मतदारसंघात विजयासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या पसंतीक्रमांचा कोटा लाड यांनी पहिल्या फेरीतच 1 लाख 22 हजार 145 मतांतून मिळवला. तर, भाजपचे देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. लाड यांनी भाजपचे देशमुख यांचा 48 हजार 824 मतांनी पराभव केला. अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेली ही निवडणूक या दोन उमेदवारांमध्ये चुरशीची होईल, असे वाटत असताना लाड यांनी या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविला.
बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी गुरुवारी मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू झाली. पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल 62 उमेदवार रिंगणात होते. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने तसेच या निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी दुसरा दिवस उजाडणार हे आधीच स्पष्ट झाले होते.
पुणे विभागात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पाचही जिल्ह्यांतून पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 50 मतदान झाले होते. मतदानाचा टक्का वाढल्यामुळे वैध आणि अवैध मतपत्रिकांच्या विभागणीचे काम सुरु मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते. 112 टेबलांवर मतमोजणी सुरू होती.
सर्व मतपत्रिकांची विभागणी केल्यानंतर 19 हजार 428 इतकी मते बाद ठरली. या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवायचा असतो. पसंतीक्रम लिहिताना क्रमांक चुकीच्या पद्धतीने लिहिला अथवा खाडाखोड केली आदी कारणांमुळे मतपत्रिका बाद ठरविली जाते. यानंतर पदवीधर मतदारसंघासाठी विजयी मतांचा 1 लाख 14 हजार 130 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.
यंदा अवैध-वैध मतांची विभागणी करतानाच पहिल्या क्रमांकाची पसंती दिलेल्या मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीपासून पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे लाड आघाडीवर असल्याचे चित्र होते. पहिल्या फेरीत 1 लाख 23 हजार 200 मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीचे लाड यांना 62 हजार 992 पहिल्या पसंतीची मते मिळाली. तर भाजपचे देशमुख यांना 35 हजार 32 मते मिळाली. पहिल्या फेरीत निम्मी मते मोजून झाली असता यामध्ये लाड यांनी 27 हजार 960 मतांची आघाडी घेतली होती.