पुणे – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसचे जयंत आसगावकर हे विजयी झाले आहेत, त्यांनी अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांचा पराभव केला. या निवडणुकीमध्ये भाजपची घसरण झाली असून भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयासाठी आवश्यक असलेल्या 25 हजार 114 मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण न केल्याने शेवटच्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील दुसऱ्या क्रमाकांची मते इतर उमेदवारांच्या पारड्यात टाकण्यात आली, 34व्या फेरीत आसगावकर यांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण केला.
शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. तर, अंतिम निकाल शुक्रवारी रात्री आठ वाजता जाहीर करण्यात आला. या मतमोजणीला 36 तास लागले.
विजयासाठी आवश्यक असलेली मते कोणाला मिळू शकली नसल्याने पसंतीक्रमानुसार मते मोजण्यात आली. त्यामुळे शेवटची मते असलेल्या 35व्या उमेदवाराच्या मतांपासून मोजणी करण्यात आली तरी मतांचा कोटा पूर्ण होऊ न शकल्याने ही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवाराच्या मतपत्रिकेमधील दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. त्यामध्ये आसगावकर यांनी विजयाचा कोटा पूर्ण केला.
पहिल्या फेरीपासून कॉंग्रेसचे आसगावकर यांनी आघाडी घेतली होती. मात्र, 34 व्या फेरीमध्ये त्यांना 25 हजार 985 मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले.