महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यातून मिळालेला कौल अपेक्षित असाच आहे. त्याला कारण भारतीय जनता पार्टीचा प्रवास ज्या दिशेने आणि वेगाने सुरू होता, त्याची फलनिष्पत्ती हीच होणार होती. एकूण सहा जागांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजपला केवळ एकच मिळाली. त्यातही त्यांनी आनंद मानायचे कारण नाही. धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची ही जागा. ती भाजपच्या अमरिश पटेल यांनी जिंकली.
अमरिश पटेल त्या भागातले बडे प्रस्थ आहेत. अगदी सर्वार्थाने. ते भाजपकडून किंवा अन्य कोणाकडून किंवा अगदी अपक्ष लढले असते तरी जिंकले असते. त्यांचा स्वत:चा दबदबा आहे. प्रचंड धनशक्तीही आहे. मुळात अमरिश पटेल कॉंग्रेसचे. देशात कोणतीही लाट अथवा त्सुनामी आली तरी त्यांच्यावर क्वचितच त्याचा प्रभाव पडला. असे अमरिश पटेल भाजपच्या गळाला लागले. वर्षभरापूर्वी असे अनेक मोहरे भाजपच्या गळाला लागले. ते आपापल्या भागातील संस्थानिकच. त्यामुळे ते निवडून आले नसते तरच नवल होते, पण आपली ताकद यातून वाढली असा भाजप नेत्यांनी गैरसमज करून घेतला. त्यातून जो फाजील आत्मविश्वास निर्माण झाला तो आज त्यांना भोवतोय.
देशात मोदी लाट आहे व होती हे मान्यच. ती आता जरी ओसरत चालली असली तरी तिचा प्रभाव पूर्णत: ओसरायला काही काळ जावा लागणार आहे. मात्र, मोदींचा स्वत:चा एक करिश्मा आहे. वक्तृत्व शैली आहे. त्या जोडीला अमित शहांची रणनीती असते. त्यामुळे त्यांनी गेल्या सहा वर्षांत जोरदार यश संपादन केले. मात्र, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी एकच कार्ड चालते असे नाही. ते भाजपच्या राज्यातील नेत्यांना उमगले नाही. मोदी-शहांच्या ताकदीवर बेटकुळ्या फुगवण्यातच त्यांनी धन्यता मानली. त्यातून त्यांच्या वाणीतून जे शब्दालंकार झडत होते तेच त्यांना भोवत असल्याचे पुन्हा एका पराभवानंतर समोर आले. पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि धुळे-नंदूरबार अशा सहा जागांसाठी निवडणूक झाली. यातील पुणे आणि नागपूर तर भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. त्याला कारण गेल्या वीस वर्षांत भाजपने पुण्यात किमान या निवडणुकीत पराभव पाहिलेला नाही. नागपूर तर त्यांचा बालेकिल्ला. भाजपचे पितृत्व असणाऱ्या संघाचे मुख्यालय येथलेच.
संघाचे देशभर जाळे आहे. अर्थातच नागपूरमध्येही ते असणार नव्हे, आहेच. भाजपचे आजच्या घडीला राज्यातील दोन बलवान नेते येथलेच. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या मतदारसंघात भाजप उमेदवाराला कॉंग्रेसने धूळ चारली. पुण्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेली जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने पटकावली. शिक्षक मतदार संघात कॉंग्रेस उमेदवाराने मुसंडी मारली. या निकालांचे भाजपने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मुळात आपण अजूनही सत्ताधारी असल्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे. सार्वत्रिक निवडणुका वेगळ्या असतात. मतदार राजा प्रगल्भ असतो असे लाख म्हटले तरी सर्वसामान्य मतदार प्रत्येक वेळी ती दाखवतोच असे नाही. अनेकदा ते सिद्धही झाले आहे. त्यामुळे त्या निवडणुकीची रणनीती, मोर्चेबांधणी, तिची तयारी व त्याचा कौल वेगवेगळा असू शकतो.
काही वेळा अपेक्षित गोष्टी करूनही अपेक्षित कौल साधता येतो. मात्र, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक वेगळी. हा वर्ग मुळात सुशिक्षित असतो. माणूस सुशिक्षित असला की प्रत्येकाची स्वत:ची एक वैचारिक बांधीलकी असते. त्याच्या स्वत:च्या कळत नकळत तो कोणाकडे तरी झुकलेला असतो. त्यामुळे त्याला बऱ्याचदा गृहीतही धरले जाते. हा आपला मतदार आहे, कुठे जाणार नाही असा विश्वास राजकीय पक्षांच्या मनात निर्माण झालेला असतो. तसा पुणे आणि नागपूरच्या बाबतीत भाजपचा झालेला होता. त्याला अर्थातच त्यांना इतक्या वर्षांत येथे कोणी आव्हान देऊ शकले नाहीत हे कारण.
मात्र, त्यामुळे आलेली बेफिकिरी आणि प्रत्येक वेळी केली जाणारी अनावश्यक वक्तव्ये कुठेतरी एका टप्प्यावर पटेनाशी होतात. तसेच यावेळी झाले. त्यातून भाजपच्या अपेक्षित मतदारानेही अनपेक्षित कौल दिला. मुळात भाजपने विधानसभा निवडणुकीचा पराभवच अद्याप स्वीकारलेला नाही. वर्ष झाले तरी ते त्यातून बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांच्या सगळ्यांत जास्त जागा आल्या होत्या. त्या अर्थी कौल त्यांना मिळाला होता, हा त्यांचा युक्तिवाद मान्य. मात्र, तीस वर्षे सोबत असलेला मित्र अचानक विरोधी पक्षांच्या तंबूत जाऊन बसला त्याचे विश्लेषण त्यांनी काय केले? बरे हे केवळ एका राज्यात झाले असेही म्हणता येत नाही. अन्य ठिकाणीही जुने जोडीदार साथ सोडत आहेत.
बिहारमध्ये ती चूक भाजपने सुधारली असे म्हणता येईल. मात्र, तरी त्याला उशीरच झाला. अगोदर म्हटल्याप्रमाणे मोदी अथवा शहा जे काही करतील किंवा बोलतील ती त्यांची स्वत:ची ताकद आहे. मात्र, स्थानिक स्तरावर त्या ताकदीचा दुरुपयोग अथवा उन्माद होता कामा नये. रोजच विरोधकांवर फैरी झाडणाऱ्या नेत्यांची एक फौजच गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपने विकसित केली आहे. सोशल मीडिया ज्यांच्याकडे देण्यात आले आहे त्यांच्याकडेही फारशी सहिष्णुता असल्याचे अथवा तारतम्य असल्याचे दिसून येत नाही. याच्या व्यतिरिक्त नॉन पार्टी प्लेअरही भाजपच्या दिमतीला आहेत. ही नॉन पार्टी प्लेअर मंडळी लौकीक अर्थाने भाजपची सदस्य नाहीत. मात्र, भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांपेक्षा यांचीच आक्रमकता जास्त. गेल्या काही काळात टीव्ही, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सर्वच ठिकाणी सगळ्यांनाच यांचे दर्शन झाले आहे.
राजकीय विरोधकाला कस्पटासमान लेखण्यापासून त्याचा एकेरी उल्लेख करण्यापर्यंत सगळेच प्रकार त्यांनी केले. यात त्यांचे व्यक्तीश: काही नुकसान नव्हते. मात्र, भाड्याच्या लाठीने मारण्याच्या प्रयत्नात भाजपने स्वत:च्याच विरोधात वातावरण तयार करून ठेवले. पदवीधर अथवा शिक्षक मतदार किमान तेवढा जागरूक असतो. कोणता विचार, नेता आणि पक्ष त्याला आवडतही असला तरी चुकीच्या गोष्टीचे त्याची सदसद्विवेकबुद्धी समर्थन करू शकत नाही. तो विकला जाऊन मतदान करत नसतो, तर त्यावेळच्या स्थितीचे आकलन करून घेऊन निर्णय घेत असतो. गेल्या पाच-सहा महिन्यांतील घडामोडी पाहता सातत्याने सत्ताधाऱ्यांबद्दल निगेटिव्ह प्रचार कुठेतरी भाजपच्या अंगलट आला.
समस्या आणि प्रश्न बरेच होते. त्यावर चर्चा करायला हवी होती. टीका करण्याचा विरोधी पक्षाला अधिकार आहेच. मात्र, त्यातही सौम्यता हवी. आक्रमकता आणि आक्रस्थाळेपणा हाच स्थायीभाव राहिला तर तो रुचेनासा होतो. तसे झाले. “आम्ही विरोधकांची ताकद जोखण्यात कमी पडलो’ अथवा “तीन विरुद्ध एक असा सामना झाल्यामुळे पराभव झाला’ हे विश्लेषण वरवरचे झाले. मुळात चुकीच्या मुळाशी जाण्याची अजूनही तयारी नसल्याचेच ते दर्शवते. ती चूक जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत केवळ सत्ताबदलाची भाकिते करून काहीही होणार नाही. उलट हा स्वत:लाच फसवण्याचा प्रकार असेल, हे तरी आता भाजपला उमगायला हवे.