पुणे – न्यायालयात चारही बाजूंनी काम सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे कॅन्टीन पाडल्याने वकील, पक्षकार यांना दुपारच्या वेळेत बसून जेवण करण्यासाठी हक्काची जागाच राहिलेली नाही. नवीन इमारतीशेजारील कॅन्टीनला पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने सर्वांचीच गैरसोय झाली आहे. न्यायालयीन प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आणि उच्च न्यायालयाशी पत्रव्यवहार करूनही कोणतीच दाखल घेतली न गेल्याने अखेर वकिलांनी गांधीगिरी पध्दतीने आंदोलन सुरू केले आहे.
शुक्रवारपासून (तीन दिवस) न्यायालयातील नवीन इमारतीसमोर जमिनीवर बसून जेवण करीत वकिलांनी निषेध व्यक्त केला. ‘वकील एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात येत आहेत. जोपर्यंत कॅन्टीनला पर्यायी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत दररोज नवीन इमारतीसमोरच जमिनीवर बसूनच जेवण करणार असल्याचा निर्धार वकिलांनी केला.
यापूर्वीच एक कॅंन्टीन बंद झाले आहे. त्यानंतर आता मेट्रोच्या कामामुळे नवीन इमारती शेजारी असलेले कॅन्टीन तातडीने पाडण्यात आले आहे. अजून तिथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही झालेली नाही. तरीही आधीच कॅन्टीन जमीनदोस्त केल्यामुळे वकील आणि पक्षक यांच्यासमोर बसून जेवण करण्यासाठी जागाच राहिलेली नाही. काही वकिलांना कुठेतरी आडोशाला उभे राहून उभ्यानेच चार घास खाण्याची वेळ येत आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे. पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह वकील येथे उपलब्ध राहत आहेत.
“जोपर्यंत कॅंटीन सुरू होत नाही अथवा वकिलांना जेवणासाठी पर्यायी जागा उपलब्ध होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. नवीन इमारतीसमोर बसून् जेवण केले जाणार आहे.” – अॅड. विश्वजित पाटील, उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन