“सीबीएसई’ बोगस “एनओसी’ प्रकरणाची व्याप्ती वाढली
संजय कडू
पुणे – “सीबीएसई’ अभ्यासक्रमाशी संलग्न असलेल्य शाळांच्या मान्यतांबाबत बोगस ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागांतील काही शाळांनीही अशी “एनओसी’ घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यासाठी एक टोळी कार्यरत असून, ती मागील काही वर्षांपासून शिक्षण संस्थांच्या संपर्कात आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
… असे आहे प्रकरण
बोगस “एनओसी’प्रकरणी मागील महिन्यात समर्थ पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यात तीन शाळांकडे असे प्रमाणपत्र असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. मात्र, यावर शाळांनी “आम्ही फक्त प्रस्ताव दिला होता. आम्हाला एनओसी मिळाली नाही,’ असा जबाब दिला. तर काही शाळांनी प्रस्तावच दाखल केला नसताना त्यांच्या नावेही “एनओसी’ काढण्यात आल्याचे उघड झाले.
या प्रकरणाची शिक्षण विभागानेही गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील सर्वच सीबीएसई शाळांच्या प्रमाणपत्राची पडताळणी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. शाळांकडील आवक-जावक रजिस्टरमधील नोंदीनुसार ही तपासणी होत आहे. याप्रकरणातील टोळीचे “नेटवर्क’ मंत्रालयापर्यंत असल्याचे समजते.
सीबीएसई शाळांच्या बोगस “एसओसी’ प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांच्य आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात यावा, असा प्रस्ताव आम्ही नुकताच आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवला आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– संदीपसिंह गिल्ल, उपायुक्त, परिमंडळ-1
शाळा आणि आरोपी निष्पन्न, हजारो विद्यार्थी टांगणीला
समर्थ पोलिसांनी केलेल्या तपासात अर्ध्या डझनहून अधिक शाळांनी बोगस “एसओसी’ मिळवल्याचे दिसत आहे. शहरासह ग्रामीण भागांतील शाळांनीही असे प्रमाणपत्र मिळवले आहे. यामुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यापेक्षा प्रकरणाचा एकत्रित तपास आवश्यक आहे. समर्थ पोलीस ठाण्याने परिमंडळ-1 चे उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्यामार्फत असा प्रस्ताव आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवला आहे. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.