भुईंज – सातारा- पुणे महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत खंबाटकी बोगद्यात सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या इनोव्हा कारच्या भीषण अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत पावलेल्या दोघी मायलेकी आहेत. कारमधील सर्व जण पुणे येथील रहिवासी असून ते सर्व जण गोकर्ण महाबळेश्वर येथे दर्शन घेतल्यानंतर पुण्याच्या दिशेने निघाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे- बंगळुरू महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत खंबाटकी बोगद्यामधून पुण्याकडे निघालेली इनोव्हा कार (एमएच 14 डीएफ 6666) सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. या कारमध्ये पुण्यातील सराफ कुटुंबीयातील सात जण प्रवास करत होते. ते इनोव्हा कार ने गोकर्ण महाबळेश्वरचेदर्सन घेऊन पुन्हा पुण्याला जात असताना त्यांच्या कारला खंबाटकी बोगद्यात अपघात झाला. ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्यावरील कठड्याला धडकली.यामध्ये रंजना सराफ आणि शांताबाई जाधव या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दीड वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. जखमींना शिरवळच्या जोगळेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.