पुणे – प्रसिध्द हॉटेल ‘सांबार’ ची फ्रेंन्चायची देण्याच्या नावाने एका व्यवसायीकाची 30 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सांबार हॉटेलचे मालक, त्यांचा मुलगा आणि मुलीविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संजय शामराव येवले (55,रा.मोरेबाग,कात्रज) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामजयम गोविंदराज आय्याकुट्टी, स्वप्निल रामजयम आय्याकुट्टी आणि अनुप्रिता रामजयम आय्याकुट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार येवले यांचा कॅफे एक्सप्रेसो नावाने व्यवसाय होता. व्यवसाय नीट चालत नसल्याने त्यांनी सांबार हॉटेलची फ्रेंन्चायची घेण्याचे ठरवले. यासाठी ते भापकर पेट्रोलपंप येथील सांबार हॉटेलमध्ये 2019 रोजी रामजयम आणि स्वप्निल यांना भेटले. त्यांनी फ्रेंचायसी देण्याची तयारी दर्शवत मगरपट्टा सीटी आणि बाजीराव रस्ता येथील हॉटेलची छायाचित्रे दाखवून विश्वास संपादन केला.
फ्रेंन्चायससीसाठी 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच भागीदारीत होणारा फायदा 50 टक्के वाटून घेतला जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर नवीन भांडी आणि खुर्च्यांसाठी दहा लाख घेण्यात आले. तसेच कामगारांचा पगार देण्यासाठी पाच लाख उधार घेण्यात आले. ही सर्व रक्कम रोख स्वरुपात घेण्यात आली. याची कोणतीही पावती देण्यात आली नाही. पैसे दिल्यानंतरही फ्रेंन्चायसी दिली जात नव्हती. पैशाची मागणी केल्यावर त्यांच्या मुलीने बंगलोर येथील सदनिका विकून पैसे देणार असल्याचे सांगितले.
पैशाची सतत मागणी केल्यावर दहा लाखाचे तीन धनादेश देण्यात आले. मात्र हे धनादेश भरल्यावर ते बाऊंन्स होऊन खाते बंद असल्याचे स्टेटमेंट आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच येवले यांनी तक्रार दाखल केली. याप्रकणाचा तपास उपनिरीक्षक नितीन जाधव करत आहेत.