पारनेर – दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पारनेर-नगर मतदार संघातील 19 गावांना प्रत्येकी पाच लाखांचे जीम साहित्य मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. पळशी गावासाठी ओपन जीमचे साहित्य मंजूर झाले असून उर्वरीत 18 गावांसाठी इनडोअर जीम साहित्य उपलब्ध होणार आहे.
म्हसणे सुलतानपूर, गटेवाडी, अळकुटी, कुरूंद, तिखोल, पळसपूर, काताळवेढा, भोयरेगांगर्डा, नांदूरपठार, हिवरे कोरडा, टाकळी ढोकेश्वर तसेच जखणगाव, खडकी, वाकोडी, नांदगांव शिंगवे, नेप्ती व चास या गावांना साहित्य उपलब्ध झाले.
आ. नीलेश लंके म्हणाले, राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता अर्थ व नियोजन ही खाते आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघाला निधीची कमतरता भासरणार नाही. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांनी विविध रस्त्यांसाठी तब्बल 29 कोटींचा निधी दिला आहे. अजूनही मोठा निधी मतदारसंघासाठी उपलब्ध होणार आहे.
पारनेरची पाणी योजना लवकरच
पारनेर शहराची महत्वाकांक्षी पाणी योजनाही आता लवकरच मार्गी लागणार आहे. या योजनेची तांत्रिक मंजुरी यापूर्वीच मिळाली असून आता अजित पवार यांच्या माध्यमातून या योजनेसाठी प्रशासकीय मान्यता मिळेल. पारनेरकरांच्या जिव्हाळ्याचे शाश्वत पाणी योजनेचे काम मार्गी लागेल, असा विश्वास आ. लंके यांनी व्यक्त केला. नगरविकास खात्यामार्फत पारनेर शहरातील विविध विकास कामांनाही निधी उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.