पुणे : रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची आरास, ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर… अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू झाली.
दरम्यान, मानच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक पाहायला मिळाले.
शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर कसबा गणपती आल्यानंतर इथे बेलगाम चौकात मुस्लिम बांधवांनी कसबा गणपतीच्या पालखीचे सारथ्य केले. तसेच लहान मुलांसाठी लाठी-काठी आणि तलवार बाजी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.