पुणे –शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील 5 हजार 276 अस्थायी पदांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वित्त विभागाच्या निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात केलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. शिक्षण आयुक्त व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील वर्ग-4 मधील 261 पदे निर्मित करण्यात आलेली आहेत. या पदांची छाननी करण्याचे काम सुरू आहे.
अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत 2003 च्या आकृतीबंधानुसार व त्यानंतर निर्गमित शासन निर्णयानुसार पदांचा विचार करून सर्वकष प्रस्ताव सादर करण्याबाबत शिक्षण आयुक्तांना सूचना देण्यात आल्या असल्याने वेतनाचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता अस्थायी पदांना 1 मे ते 30 जून या दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
शिक्षण आयुक्त व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अस्तित्वात असलेल्या एकुण 7 हजार 60 पदांमध्ये 1 हजार 784 स्थायी पदे, तर 5 हजार 276 अस्थायी पदे आहेत. लेखाशीर्षाखालील मंजूर तरतूदीमधून खर्च न होणारी एकूण 136 पदे आहेत. त्यात 13 स्थायी पदे तर 123 अस्थायी पदे आहेत.