पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (म्हाडा) राबविण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेसाठी विविध गटांसाठी उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्याबरोबर घरासांठीचे क्षेत्रफळ सुधारित करण्यात आले आहे. तसेच मोठी शहरे व उर्वरित महाराष्ट्रासाठी उत्पन्न मर्यादा असणार आहे. यामध्ये मोठ्या शहरासांठी अत्यल्प उत्पन्न गटाची मर्यादा तीन लाखांवरून सहा लाख करण्यात आली आहे. तर, अल्प उत्पन्न गटाची मर्यदा 9 लाखांपर्यंत करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाने अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गट या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या चटई क्षेत्रफळाच्या धर्तीवर म्हाडाच्या घरांसाठी क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. आता उत्पन्न मर्यादेनुसारच सदनिकांचे वाटप केले जाणार आहे. उत्पन्नासाठी गट निश्चित करताना शासनाने शहरांची विभागणी दोन प्रवर्गात केली आहे. यामध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पीएमआरडीए क्षेत्र, नवी मुंबई महानगर आदी प्राधिकरणे तसेच 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे यांसाठी उत्पन्नाची मर्यादा वेगळी केली आहे.
यापूर्वी अत्यल्प गटासाठी वार्षिक उत्पन्नाची 3 लाख रुपयांपर्यंत होती. तर अल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची अट 3 ते 6 लाख रुपयांपर्यंत
मध्यम वर्गासाठी वार्षिक उत्पन्नाची अट 6 ते 9 लाख रुपयांपर्यंत आणि उच्च उत्पन्न गटसाठी वार्षिक उत्पन्नाची अट 9 लाख रुपयांच्या पुढे अशी उत्पन्न मर्यादा होती. आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे.