पुणे – महापालिकेच्या मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी आता महापालिकेकडून थकबाकीदारांना थेट फोन केले जाणार आहेत, त्यासाठी महापालिकेकडून पुढील आठवड्यापासून कॉल सेंटर सुरू केले जाणार आहे. फोन करण्यासाठी १०० कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. दिवसाला १० हजार फोन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. थकबाकी वसुलीसाठी महापालिका वेगवेगळ्या उपायोजना राबवीत असून त्यात आता कॉल सेंटरची भर पडली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात कर संकलन विभागास २५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, आर्थिक वर्ष संपण्यास एक महिना शिल्लक राहिला असला तरी अद्याप कर विभागाला दोन हजार कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा गाठता आलेला नाही, ही बाब लक्षात घेऊन कर संकलन विभागाकडून शहरात मोठ्या प्रमाणात मिळकती सील केल्या जात आहेत तसेच सील गेलेल्या मिळकतींचा लिलाव केला जात आहे.
या सिलिंगच्या कारवाई सोबतच पालिकेकडून मागील आठवड्यापासून थकबाकीदारांच्या दारात बँड वाजवण्यास सुरुवात केली आहे, त्याचा फायदा होत असला तरी थकबाकीची रक्कम मोठी असल्याने तसेच आर्थिक वर्षाच्या शेवटचा महिना असल्याने महापालिकेने प्रत्येक थकबाकीदाराला फोन करण्याचा निर्णय घेतला आहे.
समाविष्ट गावांतील थकबाकीदारांना…
महापालिकेकडून मागील वर्षांत नव्याने समाविष्ट २३ गावांसह, शहरात एकूण साडेबारा लाख मिळकतींना दिले असून त्यातील साडेनऊ लाख मिळकत धारकांनी कर भरलेला आहे तर अद्यापही जवळपास तीन लाख नागरिक कर भरलेला नाही. महापालिकेकडे मिळकतकर धारकांचे सुमारे नऊ लाख मोबाइल क्रमांक आहेत, त्यातील थकबाकी असलेल्या नोंदणी क्रमांक वर फोन केला जाणार आहे. कर भरण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. महापालिकेचे कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी ही माहिती दिली.