कारच्या बोनटवर बसून बेजबाबदार प्रवास
दिवे – मागील महिन्यात दिवे घाटात नववधू कारच्या बोनेटवर बसून लग्नाला गेली होती. त्यावेळी गुन्हा दाखल झाल्याचे उदाहरण ताजे असतानाच आता पुन्हा पुरंदर तालुक्यातील भिवरी-गराडे रस्त्यावर अतिउत्साही दोन युवकांनी बोनेटवर बसून स्टंटबाजी केली. आता पोलीस यंत्रणा काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भिवरी-गराडे रस्त्यावरील शंकराचे चतुर्मुख मंदिर परिसरात अतिउत्साही दोन युवकांनी बेजबाबदारपणे कारच्या बोनेटवर बसून प्रवास केला. गाडी चालकाला पुढील काही भाग दिसत नसल्याने बोनेटवरील एक युवक हातवारे करत चालकाला रस्ता सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अशा पद्धतीने धोकादायक कार चालवून जीवघेणा प्रवास केला. या अतिउत्साही युवकांना कायद्याच्या धाकाचा विसर पडल्याचे या ठिकाणी दिसले.
शनिवार-रविवार-सोमवार तीन दिवस सलग सुट्ट्या असल्याने काही आती उत्साही पुण्यातील तरूण दिवे घाटासह भिवरी-गराडेच्या सिमेवर असलेल्या चतुर्मुख घाटात आले. कायद्याची पायमल्ली करणारी ही घटना उघडकीस आली आहे.
लॉकडाऊन शिथील होत असतानाच अतिउत्साही लोक आता पर्यटनाला घराबाहेर पडत आहेत. करोनाचे सर्व नियम अगदी पादळी तुडवण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. रविवार व स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पुरंदर तालुक्यातील पर्यटनाच्या प्रत्येक स्थळावर गर्दी दिसून आली.
दिवे, बापदेव घाट, कापुरहोळ-नारायणपूर, गराडे-खेडशिवापूर घाट, वीर धरण या सर्व परिसरात तालुक्यासह शेजारच्या भोर, वेल्हे तालुक्यातील पर्यटक, नागरिक ये-जा करीत होते. यातील अनेकांच्या तोंडावर मास्कच नव्हते, त्यामुळे आपसुकच ही करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण ठरणार आहे. जर नियम नाही पाळले तर पुन्हा लॉकडाऊन आहे. तरी नागरिकांनो अतिउत्साह टाळा आणि करोनाचे नियम पाळा असे आवाहन सर्व स्तरातून केले जात आहे.
कारवाई सुरू आहे
काही युवक दुचाकी दामटत फटाफट मोठे आवज काढत होते. तर या दोन अतिउत्साही युवकांनी तर कळस केला दोघंनी चक्क कारच्या दर्शनी भाग असलेल्या बोनेटवर बसून प्रवास करत व्हिडीओ व्हायरल हि केले. जणू काही रस्ता सुरक्षा कायदा हा न पाळण्यासाठीच असतो अशा आविर्भात हे युवक दिसून आले. आता पुरंदरच्या पोलिस यंत्रने पुढे आव्हान आहे की अशा आगाऊपणाला आळा घालण्याचे व कायद्याचा धाक दाखवण्याची गरज असून त्यांची संपर्क केला असता कारवाई करू असेही सांगितले.