पुणे -शहरालगतच्या “ताम्हिणी वन्यजीव अभयारण्या’त पालीच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. “हेमिडॅक्टिलस’ कुळातील या पालीचे ताम्हिणी परिसराच्या नावावरून “हेमिडॅक्टिलस ताम्हिणीएन्सिस’ असे नामकरण करण्यात आले आहे.
पुणे आणि रायगडाला जोडणाऱ्या ताम्हीणी घाटामधील वन्यजीव अभयारण्यामधून वन्यजीव अभ्यासकांना पालीच्या या नव्या प्रजातीचा शोध लागला. ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन या संस्थेतील संशोधक अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि इशान अग्रवाल यांनी “ताम्हीणी अभयारण्या’मधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला असून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “झूटॅक्सा’ या संशोधन पत्रिकेत याबाबतचे संशोधन वृत्त प्रकाशित करण्यात आले. ताम्हिणी घाटामधील बेसाल्ट खडकावर या पालीचा प्रामुख्याने अधिवास आहे.
ही पाल निशाचार असून तिचा आकार 126 मिलिमीटर एवढा आहे. त्यामुळे भारतामध्ये “हेमिडॅक्टिलस’ कुळात सापडणाऱ्या दोन मोठ्या पालींमध्ये तिचा समावेश झाल्याचे खांडेकर यांनी सांगितले. मातेरी रंगाच्या या पालीचे खडकावर आढळणारे कीटक आणि इतर पाली हे प्रमुख खाद्य आहेत.
सामान्य भाषेत तिचे नाव “बेसाल्ट जायन्ट गेको’ किंवा “ताम्हिणी जायन्ट गेको’, असे ठेवण्यात आले आहे. या संशोधनाच्या सर्वेक्षणासाठी स्वप्नील पवार, सतपाल गंगलमाले आणि पराग चौधरी यांनी मदत केली आहे.
साधर्म्यामुळे झाले होते दुर्लक्ष…
वन्यजीव संशोधकांना 2008 मध्ये उलगडलेल्या “हेमिडॅक्टिलस आरोनबाउरी’ या पालीशी ताम्हिणी घाटातील “हेमिडॅक्टिलस ताम्हिणीएन्सिस’ ही पाल साधर्म्य साधत असल्यामुळे तिच्याकडे दुलर्क्ष झाले होते. मात्र, वन्यजीव संशोधकांनी या पालीची डीएनए आणि आकारशास्त्राचे आधारे तपासणी केली.
त्यातून ही पाल वेगळी असून ती विज्ञानाकरिता नवीन असल्याची माहिती त्यांना मिळाली. जैवविविधतेने समुद्ध असलेल्या सह्याद्रीच्या पट्ट्यातील ताम्हिणी घाट परिसर हा अनेक प्रदेशनिष्ठ प्रजातींचे अधिवास क्षेत्र आहे. पालीच्या नव्याने आढळलेल्या प्रजातीमुळे ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे, असे संशोधकांनी सांगितले.