प्रांत अधिकारी ः आंबेगाव, जुन्नर तालुक्यासाठी मंचर येथे नियोजन
मंचर – आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील रिक्त असलेल्या 68 पोलीस पाटील पदासाठी लेखीपरीक्षा रविवार (दि. 8) मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात पार पडणार असल्याची माहिती जुन्नर, आंबेगावचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी पुणे (कुळकायदा शाखा) यांचे पत्रानुसार 9 जून 2023 अन्वये पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला होता. त्या अनुषंगाने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील रिक्त असलेल्या 96 पोलीस पाटील पदाकरीता 30 जून 2023 रोजी गावनिहाय आरक्षण सोडत काढून 3 जुलै 2023 रोजी पोलीस पाटील रिक्त पदांचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला होता.
4 जुलै 2023 ते 18 जुलै 2023 या कालावधीमध्ये इच्छूक उमेदवारांचे अर्ज घेऊन अर्जांची छाननी करून 24 जुलै 2023 रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली होती; परंतु प्रशासकीय कारणास्तव पोलीस पाटील भरती 2023 कालबध्द कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी पुणे (कुळकायदा शाखा) यांच्याकडील 31 जुलै 2023 च्या पत्रानुसार पोलीस पाटील भरतीबाबतचा दुरूस्त कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार पात्र उमेदवारांना 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव, उपविभाग मंचर येथे ओळखपत्र वाटप झाले आहे.
रविवारी (दि. 8) महात्मा गांधी विद्यालय, मंचर येथे सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत लेखी परीक्षा होणार आहे. बुधवारी (दि. 11) मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करून कागदपत्रांची पडताळणी आणि तोंडी मुलाखत गुरुवार (दि. 12) ते रविवार (दि. 15) सकाळी 10:30 वाजता होणार आहे. पात्र उमेदवारांची निवड यादी बुधवारी (दि. 18) सायंकाळी 6 नंतर प्रसिद्ध होणार असून नियुक्तीचे आदेश शुक्रवार (दि. 20) देण्यात येणार आहेत.
10 गावांचे उमेदवारी अर्ज आले नाहीत
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील एकूण 96 पदांसाठी भरती असलेल्या गावांपैकी 10 गावांचे उमेदवारी अर्ज आले नसून, 18 गावांमधून आरक्षणाव्यतिरिक्त अर्ज आल्याने असे एकूण 28 जागा रिक्त राहणार आहेत, उर्वरित 68 गावांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.