वेळू- नसरापूर, भोंगवली गटात कॉंग्रेसची ताकद वाढणार : नवीन समीकरणाची नांदी
नेत्यांची अस्तित्वासाठी होणार राजकीय उलथापालथ
झेडपी, पंचायत समितीच्या पुनर्रचनेचा परिणाम
बाळू शिंदे
कापूरहोळ – वेळू – नसरापूर आणि भोंगवली- कामथडी गटातून विविध राजकीय पक्षांची उमेदवारी कोणाला मिळणार, कोणाला पक्ष सोडावा लागणार, अपक्ष कोण लढणार, यासाठी बेरजेचे राजकारण सुरू आहे. पक्षाअंतर्गत वादामुळे आणि एकमेकांना पाडापाडीच्या राजकारणात नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच पक्ष बदलांमुळे फायदा- तोटा, याची चाचपणी सुरू आहे.
पक्ष बदल करताना वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीचा दिलेला शब्द पाळणार का. आदी आव्हाने उभी आहेत. त्यामुळे मातब्बर नेते, कार्यकर्ते दोन्ही संभ्रमात आहेत. आरक्षण बदललेच तर काय करावे, याची चिंता सतावत आहे. त्यामुळे स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार सावध भूमिका घेत आहेत.
भोर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 गटांची पुनर्रचना झाली आहे. पक्षाची उमेदवारी मिळणार असेल तर सध्याचे पक्षही सोडणार असल्याचे वारे जोरदार वाहू लागले आहे. भोर तालुका कॉंग्रेसने पक्ष बांधणी मजबूत केली आहे. अंतर्गत बंडाळी नसल्याने इतर पक्षातील मातब्बर नेत्यांचा कल कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी मेगाभरतीची चर्चा आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने निवडणुका सामंजस्याने एकत्रित लढवल्या जातील, असा सूर काहीजण आळवत आहेत. सध्या मतदाराच्या संपर्कात राहण्यासाठी नेते सर्वच कार्यक्रमास हजेरी लावत आहेत. नसरापूर, वेळू आणि भोंगवली- कामथडी गटात अनेक दिग्गज नेते पक्ष बदलासाठी तयार आहेत. वेळू-नसरापूर गटात वेळू गण व नसरापूर गणांचा समावेश आहे. या गटात सर्वच दिग्गज नेते आहेत. भोंगवली-कामथडी गटात भोंगवली व कामथडी गणांचा समावेश आहे.
डावपेच कोणाच्या पथ्यावर
गट- गण रचनेनंतर सर्व राजकीय पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. गटातील इच्छुक उमेदवारांनी गट व गणातील नवीन समावेश गावांत संपर्क वाढविला आहे. आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यासाठी इच्छुक नजर ठेवून आहेत. अनेक दिग्गज नेत्यांमध्ये राजकीय मतभेद आहेत. त्यांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. एकमेकांना राजकारणात मात देण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. काही गावांची जाणीवपूर्वक अदलाबदल केल्याची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादी- कॉंग्रेसनंतर भाजप सक्रिय
राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निगडे, युवकचे अध्यक्ष गणेश खुटवड, मंदार वीर, कासुर्डीच्या सरपंच सारिका मालुसरे, कॉंग्रेसकडून भोर कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, उपसभापती रोहन बाठे, राजगडचे संचालक पोपटराव सुके, युवक कार्याध्यक्ष महेश टापरे, आप्पा चव्हाण, कापूरहोळचे उपसरपंच पंकज गाडे पाटील, शिवसेनेकडून कामथडीचे उपसरपंच नितीन इंगुळकर, किशोर बारणे, तर भाजपमधून विनोद चौधरी, अशोक पांगारे, राजेंद्र मोरे, अक्षय सोनवणे यांच्या नावाची नागरिकांत जोरदार चर्चा आहे. भोर भाजपाचे अध्यक्ष वेळू- नसरापूर गटात येत आहेत. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.