वडगाव मावळ – नव्याने स्थापन झालेल्या मावळातील वडगाव नगरपंचायतचा माझी वसुंधरा अभियानात गुण क्रमांकानुसार राज्यात सहावा तर शासकीय निर्देशानुसार पुणे विभागात चवथा क्रमांक तर पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. नगरपंचायत गटात राज्यातील एकूण 137 नगरपंचायतींचा सहभाग होता. वडगाव नगरपंचायतने शहरात देशी प्रजातीच्या एक हजार वृक्षांची लागवड व 2 हजार रोपांचे वाटप, शहरातील दर्शनीय भिंतींवर स्वच्छतेचे संदेश देणारे रंगकाम करणे, जुन्या विहिरी साफसफाई करणे, नाल्यांची स्वच्छता व पुनरुज्जीवन करणे, विहीरीवर कारंजे बसवणे, महादजी शिंदे स्मारक परिसरात सौरऊर्जा वर विद्युत लाईट बसवणे, गुढीपाडवा दिनी स्वच्छता संदेश मिरवणूक,या उपक्रमांमध्ये शहरातील नागरिकांना सहभागी करून घेत वडगाव नगरपंचायतने यशाचे शिखर गाठले.
लोणावळा -महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये लोणावळा शहराने नेत्रदीपक कामगिरी केली असून नगरपरिषद विभागात लोणावळा शहराने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर बेस्ट परफॉर्म्स भूमी विभागात लोणावळा शहराचा पहिला क्रमांक आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माझी वसुंधरा 2.0 ची सुरुवात करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांनी 5 जुन 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधी मध्ये निसर्गाशी संबंधित पृथ्वी, जल, वायु, अग्नी व आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागात केलेल्या कार्याचे मूल्यमापन करत हा निकाल जाहिर करण्यात आला आहे.
या अभियानात राज्यातील 11,969 स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंदणी केली होती. यामध्ये 406 नागरी स्थानिक संस्था व वाढदिवसाच्या 11,563 ग्रामपंचायतींचा समावेश होता. लोणावळा शहराने या अभियानात सहभाग घेत शहरात व आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती अभियान, सायकल रुट, सायक्लोथॉन असे अनेक उपक्रम राबविले. याची दखल घेत हा पुरस्कार लोणावळा शहराला जाहिर करण्यात आला आहे.
=========================