पिंपरी – लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावे, यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करतात. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले शहरातील दोन व्हिडीयो मात्र चिंता वाढविणारे आहेत. लहान मुलांना सोबत घेऊन केलेल्या क्षुल्लक चोऱ्यांचे हे व्हिडीओ मुलांना चोरीचे बाळकडू दिले जात असल्याचे दाखवून देत आहेत.
एका व्हिडिओत बीआरटी मार्गाच्या कडेला लावलेल्या झाडांच्या काठ्या दुचाकीवरील एक व्यक्ती चोरताना दिसत आहे. धक्कादायक बाब अशी की ही चोरी करण्यासाठी त्याने लहान मुलीला सोबत घेतले असून झाडांना लावलेल्या काठ्या चोरून नेत असल्याचे दिसून येते. धक्कादायक बाब अशी की ही चोरी खूप क्षुल्लक जरी असली तरी चोरी करणारी व्यक्ती मुलीसोबत घेऊन काठ्या चोरत असून चोरलेल्या काठ्या सांभाळण्यासाठी त्या मुलीकडेच देत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत मोठ्या मुले रस्त्यावरील ड्रेनेजचे झाकण चोरी करीत असल्याचे दिसून येते. हे झाकण काढण्यासाठी त्यांनी लहान मुलांनाही सोबत घेतले आह. यामुळे कोवळ्या वयातच मुलांना चोरीचे बाळकडू मिळत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचे कारण बनला आहे. गुन्हेगारी टोळ्यांमध्येही अल्पवयीन आणि तरुण मुलांची भरमार गंभीर बाब बनत चालली आहे. चांगले-वाईट याची जाण नसलेल्या लहान मुलांकडून अगदी कोवळ्या वयातच असे कृत्य करवून घेतले जात असेल तर पुढे त्यांचे भविष्य कसे असेल? याची भीती व्यक्त होत आहे.
महापालिकेने शहरात ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यांची पोलिसांना तपासाकरिता मोठी मदत होत असली तरी महापालिकेलाही आपल्या मालमत्तेवर नजर ठेवता येत आहे. काही दिवसांपूर्वी फतेचंद जैन शाळेजवळील ड्रेनेजचे एक झाकण चोरीला गेल्याचे दिसून आले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेथील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये चोरीची घटना स्पष्टपणे दिसून येत आहे. मोठ्या मुलांसोबत लहान मुलांचे एक टोळके रस्त्यावरील ड्रेनेजचे झाकण चोरून नेत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे मोठी मुले ड्रेनेजचे झाकण कसे काढायचे याबाबत लहान मुलांना सूचना देत असल्याचेही या व्हायरल व्हिडिओतून दिसून येते. केवळ ड्रेनेजचे झाकण चोरीपुरता हा विषय मर्यादित नाही. रस्त्यावरील ड्रेनेजचे झाकण चोरीला गेल्यामुळे त्यात दुचाकी जाऊन प्राणांतिक अपघातही होऊ शकतो, याचे भान चोरी करणाऱ्या मुलांना नाही. तसेच महापालिकेची ड्रेनेजची चोरीलेली झाकणे विकत घेणारा भंगारवालाही कोणीतरी यामध्ये सहभागी असल्याली शक्यता आहे.
झाडाच्या काठ्याही पुरेनात
दुसऱ्या व्हायरल व्हिडिओ हा बीआरटी मार्गावरील आहे. या मार्गावर महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण केले आहे. ही झाडे वाऱ्याने पडू नयेत म्हणून त्यास तीन-चार फूटांच्या काठ्या लावल्या आहेत. मात्र लहान मुलासोबत दुचाकीवरून आलेली एक व्यक्ती झाडांसाठी लावलेल्या काठ्या काढून त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या लहान मुलाच्या हाती देत असल्याचे दिसून येते. लहान वयात मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे असताना दुचाकीवरील व्यक्ती एकप्रकारे लहान मुलीला चोरीचे बाळकडूच देत असल्याचे दिसून येते. येत्या काही दिवसांमध्ये पावसाळा सुरू होणार असून सोसाट्याच्या वारा सुटल्यास ही झाडे तुटू शकतात. या झाडांना वाचविण्यासाठी लावलेल्या काठ्या देखील चोरण्याची मानसिकता देखील दिसून येत आहे.
==============================