मंचर -जलसंपदा विभागात स्थानिक अभियंते व इतर पदवीधर तरुणांना संधी देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.
भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन अभियंता दिन पुणे जिल्हा स्थापत्य अभियंता संघटनेच्या माध्यमातून आभासी पद्धतीने (वेबिनार) द्वारे मंचर येथून साजरा करण्यात आला. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या अभूतपूर्व कामाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे संस्थापक सदस्य आणि जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर उपस्थित होते.
प्रास्ताविकात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यतीनकुमार हुले म्हणाले, स्थापत्य अभियंत्यांची वाढती संख्या व शासकीय ठेकेदारीमधील वाढता कल लक्षात घेता आमच्या अभियंत्यांना प्राधान्यक्रमाने मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून दिली जावीत. या कामांच्या गुणवत्ता बाबत संघटना देखील जबाबदारी घेण्यास तयार आहे. अभियंत्यामध्ये फक्त स्पर्धा निर्माण करून कमी दरामध्ये काम करून घेण्यामध्ये शासनाने धन्यता मानू नये. अंतर्गत स्पर्धा नियंत्रित ठेवण्यासाठी देखील संघटना महत्त्वाची भूमिका बजावेल. निवृत्ती अधिकाऱ्यांना कराराने सेवेत घेण्याऐवजी तरुण व अनुभवी अशा दोन्ही ही प्रकारच्या अभियंत्यांना अशा ठिकाणी प्राधान्याने घेण्यात यावे.
इंजि. जे एल वाबळे, सभासद उद्योजक इंजिनीयर संतोष चासकर, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी विचार व्यक्त केले. संघटनेचे संस्थापक सदस्य व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके म्हणाले, माझ्या मतदारसंघात निविदा काढताना कामे एकत्रित करून मोठी निविदा काढली जाणार नाही, याची निश्चितपणे काळजी घेतली जाईल. ज्यामुळे जास्त अभियंत्यांना कामाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त अभियंता कविवर्य शिवाजीराव चाळक यांनी अभियंत्यांची कविता प्रसूत करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत डुंबरे उपाध्यक्ष संतोष वाव्हळ सचिव सुधीर मांदळे खजिनदार जितेंद्र बागल, अवधूत शेटे, योगेश हांडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रमोद थोरात यांनी सूत्रसंचालन केले. तर अमित डावरे यांनी आभार मानले.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमात स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणजेच इंडस्ट्री 4.0 समावेश करण्याबाबतची सूचना शासनाला करू. करोनामुळे शासनाला आर्थिक प्राधान्यक्रम बदलावे लागलेले आहेत. तरीदेखील तुमचा प्रतिनिधी या नात्याने थकीत बिले लवकर अदा करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– अतुल बेनके, आमदार जुन्नर