राजकीय घडामोडीबाबत स्थानिक नेते संभ्रमात
शिरूरची 39 गावे आंबेगावकडे झुकली
अरूणकुमार मोटे
सविंदणे – महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अचानक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर शिरूर शहरात त्याचे पडसाद उमटले आहेत. दिवसभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. मात्र, पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रियांना नकार देत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार हेदेखील अजित पवार यांच्यासोबत आहेत का? अशी चर्चा रंगली. त्यानंतर अशोक पवार, दिलीप वळसे पाटील, नीलेश लंके यांचा पाठिंबा असल्याचे वृत्त समजताच अनेक पदाधिकारी नॉट रिचेबल झाले. काहींनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. काहींनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार हे उपमुख्यमंत्री होऊनही शिरूर शहरात फटाके, जल्लोष साजरा केला नाही. याचे आश्चर्य वाटत आहे.
शिरूर तालुका राजकीयदृष्ट्या शिरूर – आंबेगाव, शिरूर हवेली असा विभागला आहे. त्यामुळे शिरूरची 39 गावे ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येतात. तेथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आमदार असून, शिरूर हवेलीमध्ये ऍड. अशोक पवार हे आमदार आहेत. शिरूर शहरात पारनेर तालुक्यातील अनेक नागरिक वास्तव्यास आहेत.
पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्याशी शिरूरकरांचा थेट संबंध आहे. त्यामुळे तीनही मतदारसंघांचे आमदार काय भूमिका घेतात? याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. परंतु, हे तीनही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्याने पदाधिकारी बुचकळ्यात पडले आहे. तीनही मतदारसंघ हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असून, थेट भूमिका मांडण्यास अनेकजण नकार देत आहेत. दोन-तीन दिवसांत पदाधिकारी भूमिका स्पष्ट करतील.
शिरूर शहर व तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात 1990 पासून टोकाचा राजकीय संघर्ष आहे. ज्यांच्याबरोबर आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसावे लागणार, हे कार्यकर्त्यांच्या रूचले नाही. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे व शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रियेस नकार दिला.यासंदर्भात आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.
आम्ही वळसे पाटील यांना मानतो- गावडे
याबाबत बोलताना माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, आम्ही दिलीप वळसे पाटील यांना मानणारे असून, त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला असून, त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
+++++++++
अजितदादांच्या मागे ठाम- पाचुंदकर
शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले की, दिलीप वळसे पाटील हे ज्येष्ठ नेते असून, आम्ही त्यांच्या मागे ठाम आहोत. अजित पवार हे आमचे नेते आहेत. ते जे निर्णय घेतील त्यास आमचा पाठिंबा आहे, असे पाचुंदकर यांनी सांगितले.