विवेकानंद काटमोरे
हडपसर -राज्यातील राजकीय भूंकपानंतर स्थानिक राजकारणाचे गणितही बिघडणार आहे. तर, हडपसर मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी हे “साहेब’ की “दादा’ यांच्यापैकी कोणासोबत जाणार, याचा निर्णय हा मतदार संघातील आमदार चेतन तुपे पाटील यांच्या भूमिकेनंतर स्पष्ट होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आमदार चेतन तुपे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हडपसरमध्ये शरद पवारांना मानणारा मोठा गट असला, तरी राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी हे अजित पवार यांच्या सोबतच राहतील, असे बोलले जात आहे.
आमदार चेतन तुपे पाटील यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर, मतदारसंघात काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावले आहेत. त्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे, आणि आमदार चेतन तुपे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकांचे फोटो लावले आहेत. त्यामुळे तूर्त तरी हडपसर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी यांच्यासह इतरांचाही राजकीय संभ्रम कायम आहे.
…की चौथा उमेदवार पुढे येणार?
हडपसर विधानसभेचे आमदार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चेतन तुपे आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले योगेश टिळेकर हेदेखील येथून पुन्हा भाजपकडून दावेदार मानले जात आहेत. याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे हेही शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांचा गट असे एकत्रित असलेले सरकार यांनी पुढे निवडणूक लढविताना एकत्रित निर्णय घेतल्यास कुणाला तिकीट मिळणार, की या तिघांव्यतिरीक्त चौथाच उमेदवार समोर येणार? अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुमारे 24 माजी नगरसेवक आणि शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले असतील तर त्याची माहिती घेतली जाईल. मात्र, आम्ही साहेबांसोबत की दादांसोबत असू हे सर्वस्वी आमदार चेतन तुपे यांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हडपसर विधानसभाचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे म्हणाले.