सातारा – अजित पवार व त्यांच्या समर्थकांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांतर्गत दुफळी निर्माण झाली असून सातारा जिल्ह्यातही अजित पवार यांना मोठे समर्थन मिळण्याची शक्यता होती. मात्र, रविवारी शपथविधीला असलेले आ. मकरंद पाटील सोमवारी शरद पवार यांच्या गाडीत होते. त्यामुळे आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण वगळता जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट झाले.
अजित पवार यांचा राज्यात मोठा गट कार्यरत असल्याने अजित पवार यांना जिल्ह्यातूनही मोठा पाठिंबा मिळेल असा अंदाज होता. रविवारी मुंबईत झालेल्या शपथविधी सोहळ्याला आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण यांची उपस्थिती होती. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीत शांतता होती.
खासदार श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे निम्मी राष्ट्रवादी शरद पवारांबरोबर तर निम्मी राष्ट्रवादी अजित पवार यांच्याबरोबर असल्याचे चित्र होते. सोमवारी मात्र शरद पवार यांच्या दौऱ्यात शिरवळपासून आ. मकरंद पाटील शरद पवार यांच्या गाडीत होते. त्यामुळे शरद पवार यांचा जिल्ह्यात होल्ड असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुकास्तरीय पदाधिकारी शरद पवार यांच्याबरोबरच राहणार आहेत. सोमवारी कराड आणि सातारा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या लाडक्या नेत्याचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रामराजे व दीपक चव्हाण वगळता संपूर्ण राष्ट्रवादी शरद पवारांबरोबर असल्याचे सध्या तरी दिसत आहे.
“साहेब आम्ही तुमचेच…’
शरद पवार यांच्या सोमवारच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान समर्थकांनी कराड व सातारा येथे “साहेब आम्ही तुमचेच’ तर कराड येथे “आम्ही साहेबांसोबत’ असे फ्लेक्स लावले होते. सातारा येथे आ. शशिकांत शिंदे, दीपक पवार व त्यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले होते. त्याचप्रमाणे शासकीय विश्रामगृहात स्वागतावेळी विविध फलक झळकवण्यात आले. कराड येथे आ. बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी “आम्ही साहेबांसोबत’ अशा आशयाचे फलक लावले होते.