गावनेत्यांमध्ये चर्चेला जोर ः निवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी जोरात
दत्तात्रय गायकवाड
वाघोली – पुणे महानगरपालिकेत 23 गावांचा समावेश झाला आहे. या 23 गावांपैकी वाघोली एक गाव आहे. या गावांच्या समावेशानंतर इतर मतदारसंघाची जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणातील रचना बदलली आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार साठी वाघोलीचा समावेश झाला आहे. तर जिल्हा परिषद गटात वाघोली गाव नसल्याने मतदार संघ बदलला आहे. इतर मोठी गावे मिळून आता जिल्हा परिषदेचा मतदार संघ तयार होणार आहे.त्यामुळे वाघोली नव्या बदलांची साक्षीदार ठरणार आहे, अशी चर्चा सध्या नागरिक, गावनेत्यांमध्ये रंगली आहे.
पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना तयार होऊन त्याला अंतिम रूप मिळून आरक्षण निर्धारित होईपर्यंत वेळ जाणार आहे. या प्रभाग रचनेला व आरक्षणासाठी इच्छुकांचे लक्ष लागले आहे. सध्या जो-तो मोर्चेबांधणी करताना आपल्या गावाचा विचार करत आहे. मात्र अंदाज बांधून अनेक इच्छुकांनी गावोगावी भेटीगाठी देण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्ष यांची मिळून होणारी महाविकास आघाडी पुणे महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कायम राहणार की स्वबळावर लढणार याची देखील चर्चा हवेली तालुक्यात सुरू आहे. अनेक इच्छुकांना पक्षाने तिकीट नाकारले तर स्थानिक पातळीवर मित्र पक्षाच्या उमेदवारांना तसेच बंडखोरांना एकत्र करून गटबाजी स्थापन करून आघाडी करण्याचा देखील निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी पदाधिकारी तसेच आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, महिला बचत गट आदींची साथ मिळवण्यासाठी अनेकांनी लग्न समारंभ, वाढदिवस, यात्रा तसेच विविध कार्यक्रमांना हजेरी लावून आपले वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांमधून बिनविरोध तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमधून निवडून आलेले सदस्य, सरपंच, उपसरपंच हे आपल्या गटाकडे असावेत यासाठी काही मंडळींनी त्यांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीला पराजित झालेले, गेल्या पाच वर्षात कधीही न दिसणारे देखील आता उमेदवारीच्या रूपाने गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. अनेकांनी महिला व पुरुष या दोन्हीपैकी एक उमेदवारी निश्चित व्हावी, यासाठीदेखील दोघेही इच्छुक असल्याचे सुतोवाच दिले आहे. वाघोलीतील पहिला नगरसेवक तसेच वाघोली वगळता असणाऱ्या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य कोण हे आगामी काळातील निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे.
पुन्हा एकदा आजमावण्याची तयारी…
अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेची पदे भूषविलेले देखील निवडणुक रिंगणात उभे राहून आपले नशीब पुन्हा एकदा आजमावण्याच्या तयारीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व सिद्ध करून पुढील राजकारणाची महत्वकांक्षा मनात ठेवून काहीजण रिंगणात आहेत. लवकर जाहीर होणाऱ्या आरक्षणावर इच्छुकांची मांदियाळी निवडणुकीच्या अंतिम रिंगणात उभी राहणार आहे.