नगर – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्याबाहेरच्या बांधकाम व्यावसायिकाला निर्जन ठिकाणी बोलावून घेवून लाकडी दांड्याने मारहाण करून दहा लाख रुपये लुटल्याची घटना कर्जत तालुक्यातील कोंभळी फाटा येथे घडली. याप्रकरणी व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनंतर कर्जत पोलिसांनी एकाला अटक केली.
कर्जत तालुक्यातील कोंभळी फाटा येथे 9 फेब्रुवारी 2022 रोजी ही घटना घडली. बांधकाम व्यावसायिक संतोष रामचंद्र घुडे, (वय 43, रा. आंबिवली ता. कर्जत, जि. रायगड व त्यांचा मित्र यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले. टोळीतील एक साथिदार विठ्ठल जाधव (खरे नाव माहीत नाही) यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सोने घेण्याची तयारी दर्शविताच त्यांना नगर-सोलापूर रस्त्यावर कोंभळी फाट्याजवळील शेतात पैसे घेऊन बोलाविले. त्यांच्यावर विश्वास ठेवून घुडे व त्यांचा मित्र तेथे आले.
तेव्हा तेथे दबा धरून बसलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. घुडे यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील दहा लाख रुपये व तीन मोबाईल हॅंडसेट असा दहा लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपी पळून गेले.
घुडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करताना कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपींची माहिती मिळविण्यास सुरवात केली. तेव्हा त्यांना सचिन आल्या पवार (रा. राक्षसवाडी ता. कर्जत) याच्याबद्दल माहिती मिळाली. तो कुळधरण परिसरात असल्याचे समजल्यावर पोलिसांचे पथक तेथे गेले. तेथे आरोपीला अटक केली.