-दत्तात्रय वळसे पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आवाहन
मंचर – ‘छोडकर सारे काम, चलो करे मतदान’, येत्या १३ मेला लोकसभा निवडणुकीत न चुकता मतदान करा, असे आवाहन करत दत्तात्रयनगर, पारगाव कारखाना (ता.आंबेगाव) येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीमध्ये आपला सहभाग नोंदविला.
लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदारांनी सहभागी होऊन,आपल्या मताधिकाराचा उपयोग करून लोकशाही बळकट करण्यासाठी आणि निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी. यासाठी माझे मत, माझा अधिकार याबाबतचे संकल्प पत्र विद्यार्थ्यांनी पालकांकडून भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी ‘छोडकर सारे काम, चलो करे मतदान’, ‘जागृत नागरिक होऊया, अभिमानाने मत देवूया.’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन मतदानाबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे मतदारांना निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व समजण्यास व जनजागृती होण्यास मदत होत आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉक्टर शत्रुघ्न थोरात ,प्रा.रामनाथ फदाले ,प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते.