जांबूत : राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांवव एकवटले आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरखेड (ता. शिरुर) येथे सकल मराठा समाजबांधवांकडून राजकीय पक्ष नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
शिरुर तालुक्यातील बेट भागात राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे पिंपरखेड हे पहिले गाव ठरले आहे. जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या लढ्याला बळकट करण्यासाठी पिंपरखेड येथील मराठा बांधवांनी आरक्षण मिळेपर्यंत गावात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंद केल्याचे फलक लावले आहे.
मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास राजकीय पक्षाचे नेते जबाबदार असून निवडणुकीत मतदानासाठी आरक्षणाचे आश्वासन देऊन मराठा समाजाला झुलवत ठेवणारे राजकीय पक्षाचे नेते सर्वस्वी जबाबदार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्यांना गावात प्रवेश बंदी केली असून साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे मराठा कार्यकर्ते नरेंद्र बोंबे व हेमंत नरवडे यांनी सांगितले.