पुणे – पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणास अखेर विद्यापीठ प्रशासनास मुहूर्त मिळाला आहे. या पुतळ्याच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन दि.28 रोजी व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यामुळे आता दीड वर्षांनंतर या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण रखडले अन् या दिरंगाई या प्रश्नी दैनिक “प्रभात’ने शुक्रवारी (दि.27) “पुणे विद्यापीठ प्रशासनाची कबुली’ असे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सर्व घटकांतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी या भूमिपूजनाचा निर्णय घेतला. हा परिसर सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा पद्धतीने काम केले जाणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
विद्यापीठाची अधिसभा अर्थात सिनेट शनिवारी (दि.28) होत आहे. यावेळी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नगर, नाशिक व पुण्यातील अधिसभा सदस्य उपस्थित असतात. त्याचवेळी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता होत आहे.
“सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याचे कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याचे काम लगेच सुरुवात होणार आहे. ब्रिटिशकाळात ज्या पद्धतीने उद्यान होते, त्याच पद्धतीच्या उद्यानाची निर्मिती पुतळ्याच्या परिसरात केली जाणार आहे. हे ठिकाण पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाईल.” – डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ