पुसेगाव – ग्रीनफिल्ड बाधित क्षेत्राला खासगी वाटाघाटीने कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला द्या, शेतकरी जनजागृतीसाठी गाववार सभा घेणार आहे, अशी माहिती पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी दिली.
पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड महामार्ग बाधित खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या मठातील हॉलमध्ये पार पडला. बाधित शेतकऱ्यांच्या जनजागृतीसाठी व लढा मजबूत करण्यासाठी बेळगाव, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील बाधित गावांमध्ये गाववार सभा घेणार आहे. बाधित क्षेत्राचे मूल्यांकन करीत असताना बाधित शेतकऱ्यांबरोबर खासगी वाटाघाट करावी मगच मूल्यांकन करावे, एकाच प्रकल्पासाठी जमीन घेणार असाल तर संपूर्ण बाधित गावातील बाधित क्षेत्राला एकसमान मोबदला द्या, बाधित क्षेत्रातील बाधित बाबींना नुकसानभरपाईच्या चारपट मोबदला मिळाला पाहिजे.
पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत गेली वर्षभर संघर्ष सुरू आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत बाधित क्षेत्रात पाय ठेवू देणार नसल्याचे भाई दिगंबर कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी समितीचे राज्य सरचिटणीस प्रा. प्रल्हाद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. विष्णू जाधव यांनी स्वागत केले.
प्रसाद खराडे यांनी वर्षभरातील आंदोलनाची माहिती दिली. आपला लढा मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील बाधित शेतकरी व समितीचे पदाधिकारी प्रा. दिनकर दळवी यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीने महत्व सांगितले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष विश्वास साखरे, ओमन पाटील, अमृत नलवडे, सुभाष जाधव, भगवान जमदाडे, चंद्रकांत पाटील, नितीन साळुंखे, अनिल कोरे, हणमंतराव गोसावी, निलेश कुलकर्णी, सागर लावंड व खटाव तालुक्यातील बाधित शेतकरी उपस्थित होते.