सोरतापवाडी – पूर्व हवेलीतील कृषी, औषधे, खते, बी बियाणे विकणाऱ्या दुकानातून युरिया जवळजवळ गायब झाला आहे. दुकानदारांकडून ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांची अडवणूक होत असताना दिसत आहे.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदम वाकवस्ती, कुंजीरवाडी, सोरतापवाडी उरुळी कांचन येथे अनेक शेती औषधांची दुकाने असून बोटापवर मोजण्याइतपत दुकानांमध्ये यूरिया उपलब्ध असल्याचे चित्र दिसत आहे. ही सर्व गावे परिसरातील गावांसाठी मुख्य बाजारपेठ आहे. तसेच लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी या ठिकाणी मोठा आठवडेबाजार भरत असतो. शहराच्या जवळ असल्याने आजूबाजूच्या गावांमधील शेतकरी जास्त करून भाजीपाल्याचे उत्पन्न आपल्या शेतात घेत आहेत.
काळाबाजार होण्याची दाट शक्यता
यासाठी लागणारी रासायनिक खते व औषधे या ठिकाणी शेतकरी खरेदी करत आहे; परंतु सध्या अनेक दुकानदारांनी शेतकऱ्यांसाठी पिकाच्या दृष्टीने महत्वाची असलेली युरिया विक्री बंद केली असून पूर्व हवेलीतील अनेक गावांत यूरिया गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खताचा काळाबाजार होण्याची दाट शक्यता असून जो जास्त पैसे देईल आणि मोठा शेतकरी असेल तर त्याला युरिया व इतर खते मिळतात. पण लहान शेतकरी यात मात्र भरडला जातोय.
काही दुकानदार त्यांच्या दुकानातील औषधे व खते घेतली तरच युरिया देत आहेत. पूर्व हवेलीतील गावांमध्ये युरिया खताचा तुटवडा असून दुकानदार 1800 रुपयांची सुपला खतांची पिशवी घेतली तरच 300 रुपयांची युरिया पिशवी मिळेल असे सांगत आहेत. औषधे व खते विक्री करणाऱ्या दुकानदारांनी जर अशा पद्धतीने लूट सुरू केली तर नेमकी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे भांडवल आहे ते आधुनिक व सेंद्रिय शेती करत असून लहान शेतकऱ्यांन कडे भांडवल कमी असल्याने उधारीवर औषधे व खते खरेदी करीत असल्याने अव्वाच्या सव्वा किंमत हे दुकानदार लावत असतात. शेतकरी उधारीवर माल घेत असल्याने त्याला किंमत विचारता येत नाही. यूरिया बॅग 266 रुपये किंमत असताना शेतकऱ्यांना 300 रुपये प्रती बॅग रुपये प्रमाणे विक्री केली जात आहे.
-सचिन चौधरी/अण्णा चौधरी, येथील प्रगतिशील शेतकरी सोरतापवाडी
सर्व दुकानदारांनी जादा दराने खते व औषधे विक्री करू नये. तसेच दुकानात बोर्डावर मालाचा साठा लिहिणे भावफलक अद्ययावत करणे, साठा रजिस्टर असणे, शेतकऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे. लिंकिंग न करता खते द्यावी ज्या दुकानदारांकडे यूरिया खताचा साठा आहे. त्या दुकानदारांनी शेतकऱ्यांना कमीत कमी एक गोणी युरिया द्यावी. तसेच दुकानदारांनी साठा असला तर कुठल्याही शेतकऱ्यांची अडवणूक करू नये. व शेतकऱ्यांनी युरियाला पर्याय म्हणून नॅनो युरियाचा वापर करावा.
मारुती साळे, तालुका कृषी अधिकारी