कापूरहोळ – अल्टीमेट हायकर्स ऍण्ड ट्रॅव्हलर्स संस्थेतर्फे यंदाची दिवाळी भारत-चीन सीमेवर माना बॉर्डर येथे सैनिकांसोबत साजरी करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून संस्था अतिदुर्गम भागातील चेक पोस्टवर जाऊन जवानांसोबत साजरी करते. जवानांना शुभेच्छापत्रे, फराळ, भेटवस्तू देऊन छोटासा कार्यक्रम घेतला जात आहे.
गतवर्षी अल्टीमेट हायकर्स संस्थेने अरुणाचल प्रदेशमधील इंडो- चायना बॉर्डरवर दीपावली साजरी केली होती. तवांग येथील 10 हजार फूट उंचीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर दीपोत्सव करून महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले होते. मागील वर्षी भारत- चीन सीमेवरील गुरुडोंगमारलेक पोस्टवरील सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.
करोनाची पार्श्वभूमी असताना संस्थेचे संस्थापक योगेश आलेकरी यांनी निवडक टीम घेऊन बॉर्डरवर जाण्याचा निर्णय घेतला. योगेश आलेकरी, विशांत वचकल, अमोल लिमन, सुनील जाधव, योगेश खुटवड, शीतल चिंधे यांनी 5500 किमी दुचाकीचा प्रवास केला. भारतीताई धोंडे यांनी भावनिक हस्तलिखित टपालपत्रे दिली. भूषण भागवत यांच्या मुलीने स्वहस्ते बनवलेली शुभेच्छापत्रे, अजिंक्य हाडके यांनी मिठाईचे बॉक्स दिले.
पुण्यातून द्वारका डोके यांनी फराळ बनवून दिला. जवानांच्या वतीने व्ही. के. राणा यांनी शुभेच्छापत्रे स्वीकारली. त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीमधील चित्तथरारक अनुभव कथन केले. यावेळी अल्टीमेट हायकर्सचे संस्थापक योगेश आलेकरी, विशांत वचकल, अमोल लिमण, सुनील जाधव, योगेश खुटवड, शीतल चिंधे उपस्थित होते.