जामखेडमधील अखंड हरिनाम सप्ताहाच्या महाप्रसादातून 23 जण करोनाबाधित
ओंकार दळवी
जामखेड – तालुक्यातील सोनेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या जेवणावळीत करोनाबाधिताने वाढप्याचे काम केल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 139 व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यातील 23 जण बाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सप्ताहात आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनी हजेरी लावली. त्यामुळे करोनाचा सामूहिक संसर्ग झाला असून, रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती कायम आहे. धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधन असताना हा सप्ताह कोणाच्या परवानगीने व कोणी आयोजित केला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
तालुक्यातील सोनेगाव येथे काही उत्साही कार्यकर्त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहात काही संशयित करोनाबाधितही सहभागी झाले होते. त्यातील चार जण तीन दिवसांपूर्वी बाधित निघाले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाला हजेरी लावली होती. या कीर्तनात सोनेगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. तसेच आसपासच्या धनेगाव, वंजारवाडी, तरडगाव येथील ग्रामस्थही आले होते. या सर्वांवर कळस म्हणजे बाधित व्यक्तीनेच महाप्रसाद वाटपाचे काम केले.
त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 139 व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. त्यामध्ये 23 जण बाधित आढळले.
या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतरही व्यक्ती अँटिजेन टेस्ट करण्यासाठी पुढे येतील. त्यामुळे हा आकडा वाढू शकतो. तसेच रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येतो, त्यांचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येवू शकतो. त्यामुळे या सर्वांचीच आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे.
अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान काही करोनाबाधितांना वावर होता. चार दिवसांपूर्वी त्यातीलच चार जण करोना पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर 139 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 23 करोनाबाधित आढळून आले आहेत. अजुनही ज्यांना लक्षणे आढळतील त्यांनी तातडीने करोना टेस्ट करून घ्यायलाच हवी.
डॉ. सुनील बोराडे, तालुका आरोग्याधिकारी, जामखेड