पुणे – फटाक्यांमुळे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, सावधानतेचा इशारा नेहमीच दिला जातो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत पुणेकरांनी यंदाही मोठ्या प्रमाणात फटाके उडवले. परिणामी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील ध्वनी प्रदूषण वाढल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीतून समोर आले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्रदूषणाचे प्रमाण किंचित कमी असले, तरी प्रमाण मर्यादेपेक्षा 20 डेसिबलने अधिक राहिले आहे.
करोनामुळे यंदा बहुतांश शहरांमध्ये फटाके विक्री आणि उडविण्यावर हरित न्यायाधिकरणाने बंदी घातली. मात्र, याचा परिणाम झाला नाही. पुण्यात यंदाही मोठ्या प्रमाणात फटाके उडवण्यात आले. दरवर्षीच्या तुलनेत आवाजी फटाक्यांचे प्रमाण काहीसे कमी असले, तरी ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत कोणताही बदल आढळलेला नाही.
मंडळाने शहरात दि. 11 ते 17 नोव्हेंबरदरम्यान दिवसा आणि रात्री ध्वनीच्या प्रदूषणाची नोंद घेतली. यानुसार दि.11 ते 13 नोव्हेंबर रोजी ध्वनी प्रदूषण पातळी प्रमाण मर्यादेपेक्षा काहीसे अधिक होते. मात्र, लक्ष्मी पूजनादिवशी प्रदूषण पातळीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली. मंडळाच्या नोंदीनुसार शहरातील मंडई (81.0), स्वारगेट (80.6) आणि कोथरूड (80.1) येथे सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाची नोंद घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी ध्वनीची मर्यादा अनुक्रमे मंडई (85.4), कोथरूड (84.5), स्वारगेट (85.3) डेसिबल होती. यंदा पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात बहुतांश भागांमध्ये 70 ते 80 डेसिबल ध्वनी प्रदूषणाची नोंद घेण्यात आली.
मंडळाच्या नोंदीनुसार ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण (डेसिबल) :
- परिसर- दिवसा- रात्री
- शिवाजीनगर 75.0 – 66.7
- कर्वे रस्ता 84.7 -77.9
- सातारा रस्ता 83.9- 67.3
- स्वारगेट 87.6 -76.3
- येरवडा 81.4 -69.4
- खडकी 82.0 -73.6
- कोथरूड 87.3 -78.9
- शनिवारवाडा 76.6- 72.4
- लक्ष्मी रस्ता 86.7- 79.3
- मंडई 88.9 -78.2
- सारसबाग 84.6 -79.3
- कोरेगाव पार्क 79.7 – 64.3
- औंध गाव 79.4- 73.6
- विश्रांतवाडी 80.2 – 79.8
- विद्यापीठ रस्ता 78.1- 65.3