वाल्हे येथे स्वाधार रेज ऑफ होप प्रकल्पातर्फे जनजागृती
वाल्हे – एचआयव्ही (एड्स) बाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. याबाबतचा संपूर्ण तपशील, वैद्यकीय तपासणी, उपचार याबाबतची माहिती नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावी, त्यांच्या मनातील आजाराबाबतचे गैरसमजही दूर व्हावे या उद्देशाने पुणे येथील स्वाधार रेज ऑफ होप प्रकल्प अनेक वर्षे काम करीत आहे.
वाल्हे (ता. पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयामध्ये, ऑस्ट्रेलिया येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शहा यांच्या संकल्पनेतून, आदर्श सामाजिक फाउंडेशन, नवदिशा फाउंडेशन व महर्षि वाल्मिकी विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या माध्यमातून, शालेय विद्यार्थ्यांमध्ये, एचआयव्ही आजाराबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने पुणे येथील स्वाधार रेज ऑफ होप प्रकल्प यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरपंच अतुल गायकवाड, प्रभारी प्राचार्य राजेश सोनवणे, स्वाधार रेज ऑफ होप प्रकल्पाच्या आशा सागर, अनन्या नवार, ज्योती जगताप, आदर्श सामाजिक फाउंडेशनचे सचिव दादासाहेब राऊत, राजेंद्र डोंगर, सतीश अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर कुदळे, अनिल दुर्गाडे, संदीप जाधव, व्याख्याते कौस्तुभ जोगळेकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही (एड्स) आजाराबाबत अधिक जागृती व्हावी; तसेच जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन, अभ्यास केला पाहिजे; असे मत प्रकल्पांच्या समन्वयक उषा देशपांडे यांनी सांगितले.