बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका
आतापर्यंत 7437 वाहनचालकांवर कारवाई
आळेफाटा – सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. 1 जानेवारी 2023 ते 25 डिसेंबर 2023 या कालवधीत वाहतूक नियमांना पाठ दाखविणार्या 7 हजार 437 वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 38.33 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई आळेफाटा वाहतूक पोलिसांनी केली आहे.
आळेफाटा पोलिसांकडून सध्या हेल्मेट सक्तीकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत. या कारवाईत चारचाकी वाहनात सीटबेल्ट न वापरणार्या चालकांची सर्वांत जास्त संख्या आहे. वर्षभरात मालवाहतूक वाहनात प्रवाशांची वाहतूक करताना आढळून आल्याने 504 वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 3 लाख 16 हजार रुपर्याचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ट्रिपल सीट प्रवास करताना आढळून आल्याने 856 वाहनचालकांकडून 85 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त चारचाकी वाहनात सीट बेल्ट न वापरणार्या 2 हजार 536 वाहन चालकांकडून 5 लाख 50 हजार रुपये, 536 वाहन चालकांनी त्यांची वाहने धोकादायकरीत्या रस्त्यावर उभी केल्याने त्यांना 32 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
ब्लॅक काच असणार्या 141 वाहनांवर कारवाई करीत 1 लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लायसन्स जवळ न बाळगणार्या 878 वाहनचालकांकडून 4 लाख 75 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणार्या 180 वाहन चालकांविरुद्ध तसेच धोकादायकरीत्या रोडवर वाहन लावणार्यांवर 200 गुन्हे दाखल केले आहेत. आळेफाटा पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी 7 हजार 437 वाहन चालकांना 38.33 लाखांचा दंड वसूल केला आहे.