वाघोलीत कचऱ्याचा प्रश्न पेटला : ग्रामस्थांनी गाड्या अडवल्या
वाघोली : वाघोली येथील गोरे वस्ती रस्त्यावर असणाऱ्या कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासाला वैतागून परिसरातील नागरिकांनी शनिवारी (दि. 15) आंदोलन करीत कचरा गाड्या आडवून ठेवल्या. कचरा डेपोमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून याची दखल घेतली नाही तर महापालिका कार्यालयात कचरा आणून टाकू, असा इशारा स्थानिक नागरिकांकडून देण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून गोरे वस्ती स्त्यालगत असणाऱ्या कचरा डेपोचा प्रश्न धगधगत आहे. पावसाने कचरा कुजत आहे तर उन्हाळ्यात कचरा डेपोला आग लागण्याच्या घटना घडत असतात. दररोज पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे गोरे वस्ती परिसरातील नागरिकांना जाणे – येणे व राहणे मुश्किल झाले आहे. अनेक वर्षांपासून याठिकाणचा कचरा डेपो हटविण्याची मागणी स्थानिक नागरिक व डेपो शेजारील नागरिक करीत आहेत.
वाघोली ग्रामपंचायतीचा समावेश महापालिकेत झाला असतानाही अद्यापपर्यंत ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने शनिवारी या कचरा डेपोकडे जाणाऱ्या गाड्या अडविल्या. त्रस्त नागरिकांनी कचरा डेपो जवळ आंदोलन करीत कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका घेतली. नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. हा कचरा डेपो अनधिकृत असून तेथून तो कचरा उचलावा व पुन्हा कचरा टाकू नये, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. कचरा डेपो बंद झाला नाही तर गाडी भर कचरा महापालिका क्षेत्रीय कार्यालयात टाकला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नियोजित कचरा प्रकल्पाला विरोध
पुणे महानगरपालिकेच्या वतीने वाघोलीत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु मार्वल फ्रीया सोसायटीजवळील मोकळ्या जागेत कचरा व्यवस्थापन प्रकल्प नियोजित असतानाही याठिकाणी लोकसंख्या जास्त असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. यासंबंधित निवेदनही महापालिकेला नागरिकांनी दिले आहे. शनिवारी (दि. 15) सोसायटीतील नागरिकांनी नियोजित कचरा प्रकल्पाला विरोध दर्शविला. वाघोलीतील कचऱ्याचे नियोजन महानगरपालिकेकडून केले जात नसल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.