राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील चासकमान धरणामुळे विस्थापित झालेल्या दोन भागांना जोडणार्या भीमानदीवर बांधण्यात येणार्या कान्हेवाडी-वेताळे पुलाला केंद्रीय निधीतून मान्यता मिळाली असल्याची माहिती पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिली.
राजगुरूनगर-भीमाशंकर रस्त्याला समांतर असलेल्या चांडोली, कडूस, सायगाव, वेताळे, वाशेरे, औदर, कुडे, चासकमान, साकुर्डी, कहू कोयाळी गावांच्या परिसरातील अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांना चासकमान धरणाजवळून जाण्यासाठी रस्ता होता; मात्र भीमानदीवर पूल नव्हता. त्यामुळे हे दोन्ही भाग विस्थापित होते.
या परिसरात भीमानदीवर मोठा पूल करण्याची मागणी शासनदरबारी प्रलंबित होती. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे गेली दोन वर्षे सातत्याने मागणी करण्यात येत होती. या पुलासोबत मोहकल-सायगाव-टोकेवाडी या तीनही भीमा नदीवरील पुलांच्या निधीसाठी या भागातील ग्रामस्थ व दिलीप मेदगे यांनी पुण्यामध्ये बैठकीच्या आयोजन करीत मागणी केली होती. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही याबाबत गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. पुण्यातील बैठकीत सीआरएफमध्ये याची मागणी करावी, अशी सूचना मंत्री गडकरी यांनी केली होती.
पुणे प्रादेशिक विभागामार्फत व पुणे सार्वजनिक मंडळ यांच्या मार्फत हा प्रस्ताव तातडीने दोन वेळा केंद्राकडे सादर करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्यातील सचिव सदाशिव साळुंखे या प्रशासकीय अधिकार्यांनी पुलांचा समावेश सीआरएफच्या यादीमध्ये समाविष्ट केला होता. यापूर्वी सर्वांनी बांधकाम विभागाने नाबार्डमधून या पुलासाठी निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो अयशस्वी झाला.
साळुंखे यांनी याबाबत खात्याला सूचना केल्या. तीन पुलांपैकी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांनी कान्हेवाडी-वेताळे या पुलाला निधी उपलब्ध करून दिला आहे. वेताळेतील ग्रामस्थ बाळशिराम बोंबले, चंद्रहार बोंबले, दिलीप मेदगे केंद्रीय सचिव संकेत भोंडवे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले.
खेडमधील विकासकामांसाठी निधी
खेड तालुक्यातील कान्हेवाडी-वेताळे-साबुर्डी कुडे भीमा नदीवर पूल बांधणे (17.50 कोटी), देहू-आळंदी-मरकळ-तुळापूर रस्ता (35 कोटी) असे एकूण 52.50 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे मेदगे यांनी सांगितले.