वाफगावात पवारांचे आश्वासन : होकळरवाड्याच्या जीर्णोद्धारासाठी दिली भेट
वाफगाव – कळमोडीचे पाणी चासकमान धरणात व चासकमान धरणातून कडधे येथून बंदिस्त पाटातून वेळ नदीत सोडणार आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील आणि परिसरातील सरपंच यांची बैठक घेऊन प्रश्न लवकरच सोडवण्याचा शब्द राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
वाफगाव (ता. खेड) येथील होळकर वाड्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी व वाड्यात असणारी रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर करणे व त्यासाठी जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी शरद पवार शनिवारी (दि. 11) आले, त्यावेळी नागरिकांनी कळमोडी प्रश्नाबाबत कायम तोंडाला पाने पुसली जात असल्याबाबत पवारांना विचारल्यावर त्यांनी वरील आश्वासन दिले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार रोहित पवार, माजी आमदार राम कांडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, रयत संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थितीत होते.
औचित्य वाड्याच्या जिर्णोद्धारचे; मात्र अनेक वर्षे प्रलंबित असणारा कळमोडीचा कळीचा मुद्दा ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी घेतला. खेडच्या पुर्वेकडील वाफगाव, गुळाणी, वाकळवाडी, वरूडे, कनेरसर, पूर या दुष्काळी गावांना कळमोडीचे पाणी वरदान ठरणार आहे; मात्र अनेक वर्षे याविषयावर राजकारण होऊन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली गेल्याचे पवारांच्या निदर्शनास आणुन देण्यात आले. यावर उत्तर देताना पवार यांनी आपल्या कार्यपद्धीतीने लगेचच पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून काम होणार की नाही विचारून वरील शब्द घेत नागरिकांना आश्वस्त केले. कळमोडीचा प्रश्न सुटणार म्हणून सभेनंतर नागरिकांनी आनंदाने घोषणाबाजी करत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय भागवत, सूत्रसंचलन विनायक घुमटकर तर सुदाम कराळे यांनी आभार मानले.
ग्रामस्थांनी घेतला पुढाकार
होळकर वाड्याची जागा व सुर्वे थिटे कराळे यांची सामाईक जागा किंवा वाड्याशेजारील असणारे गावठाण अशा जागा सुचवून जागेचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली.
पाणीप्रश्न सुटल्यास राजकारण पलटणार
पाणी प्रश्नामुळे पूर्व भागातील गावे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांवर नाराज होते; मात्र आता थेट पवारांनीच दिलेला शब्द लवकर अमलात आला तर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा रंगली होती.
खेड तालुक्याच्या विकासाचा लेखा जोखा मांडून रयतच्या जागेचा प्रश्न ग्रामस्थ व होळकर कुटुंबीय व मी बसून जागेचा प्रश्न सोडवू तसेच यासाठी निधी ग्रामस्थ, आमदार, रयत शिक्षण संस्था उभारणार असून आमदार रोहित पवार, मा दिलिप वळसे-पाटील ही शाळेसाठी मदत करणार आहे.
– दिलीप मोहिते पाटील, आमदार, खेड-आळंदी विधानसभा