एक उलटला तर एक टायरच्या दुकानात शिरला : आळेफाटा येथील घटना
सुदैवाने जीवितहानी नाही ; बायपासचे काम प्रलबिंतच
बेल्हे – पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाट्या नजीक दोन मालवाहू कंटेनरचा अपघात झाला. अचानक समोर कंटेनर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून पुण्याकडे जाणारा दुसरा कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या टायर दुकानाची पत्र्याची भिंत पाडून आत शिरला. हा अपघात शनिवारी (दि. 11) पहाटेच्या सुमारास झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही; मात्र दोन्ही कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आळेफाट्या जवळ दोन मालवाहू कंटेनरचा अपघात झाला. अचानक समोर कंटेनर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून इंदोर (मध्यप्रदेश) येथून पुण्याकडे जाणारा कंटेनर (एनएल 01 एडी 8531) रस्त्याच्या कडेला असलेल्या टायर दुकानाची पत्र्याची भिंत पाडून आत शिरला. तर पुण्याकडून नाशिककडे जाणारा कंटेनर (डीडी 03 के 9408) रस्त्याच्याकडेला उलटला झाला. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने आजूबाजूचे लोक जमा झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी दुपारपर्यंत वाहने जागेवरच होती.
दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा बायपासचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शनिवारी व रविवारी आळेफाटा चौकात वाहनांची मोठी कोंडी होते. तर रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने चालणाऱ्या मालवाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे.